सत्ता सोडा मगच टीका करा एकनाथ खडसेंचा शिवसेनेवर पलटवार



मुंबई :- ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका करणाऱ्या शिवसेनेला भाजप नेते एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेची सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत नाही. त्यांनी आधी सत्तेतून बाहेर पडावे आणि मग भाजपच्या लोकांवर टीका करावी, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.बुधवारी शिवसेनेने सामनामधून एकनाथ खडसेंवर विखारी टीका केली होती. एकनाथ खडसे यांना काँग्रेस- राष्ट्रवादीकडून खुली ऑफर आहे. मात्र पदर ढळल्यावर अशी ऑफर यायचीच. या जन्मातलं कर्माचं फळ याच जन्मात फेडायचं असतं, अशा शब्दात शिवसेनेने एकनाथ खडसेंवर निशाणा साधला होता. एकनाथ खडसेंनीही आता शिवसेनेवर पलटवार केला आहे. शिवसेनेच्या टीकेची दखल घ्यावीशी वाटत नाही. शिवसेनेने आधी सत्तेतून बाहेर पडावे, मग आमच्यावर टीका करावी, अशे त्यांनी सांगितले. शिवसेनेची सत्ता सोडण्याची हिंमत नसून ते सत्तेत राहुनच भाजपवर टीका करत राहतील, असे सांगत त्यांनी शिवसेनेला चिमटा काढला.२०१४ मधील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची युती होऊ नये, अशी आग्रही भूमिका एकनाथ खडसे यांनी मांडले होती. युतीच्या राजकारणावर फुली मारली जावी आणि शिवसेनेला महाराष्ट्रातील त्यांच्या ताकदीची जाणीव करून द्यावी, यासाठी खडसे यांनी पुढाकार घेतला होता. तेव्हापासून शिवसेना आणि खडसेंमधील वैर टोकाला पोहोचले आहे. जागावाटपाच्या चर्चेतही शिवसेनेशी कोणतीच तडजोड होऊ नये यासाठी खडसे आग्रही होते आणि युती तुटल्याची घोषणा करण्याचे कामही त्यांनी खुशीने अंगावर घेतले होते. फडणवीस सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाल्यानंतरही, खडसे यांचा सेनाविरोध कायम होता. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप-सेना युती होणार नाही, असेही खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या काही दिवस अगोदर जाहीर करून टाकले होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post