Showing posts with label मुंबई. Show all posts
Showing posts with label मुंबई. Show all posts
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर धाडसत्र सुरू; एका दिवसात १७९ गुन्ह्यांची नोंद; ६० आरोपींना अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर धाडसत्र सुरू; एका दिवसात १७९ गुन्ह्यांची नोंद; ६० आरोपींना अटक


मुंबई : राज्यातील लॉकडाऊनमध्ये अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून काल एका दिवसात 179 गुन्ह्यांची नोंद केली आहे. या प्रकरणी 60 जणांना अटक करण्यात आली असून सुमारे रु. 39.66 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लॉकडाऊनमध्ये अवैध मद्य निर्मिती, विक्री करणाऱ्यांविरुद्ध उत्पादन शुल्क विभागाने कारवाई सुरू केली आहे. 24 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत राज्यात 1752 गुन्हे नोंदविण्यात आले असून 657 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 63 वाहने जप्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत एकूण 4.26 कोटी रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आजारपणामुळे सुट्टी घेतल्यास थेट वेतनकपात

आजारपणामुळे सुट्टी घेतल्यास थेट वेतनकपात


मुंबई :- गुन्ह्यांच्या तपासकामासह स्थानकांतील गर्दीच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे पोलिसांनी आजारपणामुळे सुट्टी घेतल्यास त्यांच्या वेतनात थेट कपात होणार आहे. आजारपणामुळे सुट्टीवर असलेल्या रेल्वे पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांचे वेतन रोखण्याचे लेखी आदेश रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी दिले असून, त्यामुळे रेल्वे पोलिस ठाण्यांत अपुऱ्या सुविधांसह काम करत असलेल्या पोलिसांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

'आजारपणामुळे सुट्टीवर किंवा मोठ्या सुट्टीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा पगार रोखण्यात यावा, तसेच गैरहजर राहिल्यानंतर कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वी संबंधित कर्मचारी-अधिकाऱ्यांनी आयुक्तालयात उपस्थित राहून परवानगी घेणे आवश्यक आहे', असे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, त्यावरून पोलिसांत प्रचंड नाराजी आहे. या आदेशाचा सर्वात मोठा धसका आजारपणामुळे सुट्टीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. आधीच आजारपण असताना वेतनकपातीची टांगती तलवार आल्याने पोलिसांच्या चिंतेत भर पडली आहे. या आदेशामुळे रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

मुंबईच्या लोकल हद्दीत कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम रेल्वे पोलिसांचे आहेत. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकांतील गर्दी नियंत्रणाची गरज निर्माण झाली. त्यामुळे स्थानकांवरील गर्दीच्या नियोजनासाठी रेल्वे पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बल, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मात्र, रोजची लाखो प्रवाशांची संख्या पाहता ही सुरक्षा यंत्रणा अपुरी असल्याचे सांगण्यात येते. रेल्वे पोलिस दलातील शिपाई ते सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशी अनेक पदे रिक्त आहेत. यामुळेही रेल्वे पोलिसांवरील ताण वाढत आहे. रुळ ओलांडताना किंवा स्थानकांत अन्य अपघात झाल्यास जखमी रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी हमाल उपलब्ध नसतो. परिणामी जखमींना रुग्णालयात नेण्यापासून सर्व कामे पोलिसांनाच करावी लागतात.

या कामांमुळे अनेकदा पोलिसांचा पूर्ण दिवस रुग्णालयात जातो. त्या दिवशीच्या कामकाजाचा बोजा दुसऱ्या दिवशी येतो, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. वैद्यकीय रजेचा गैरवापर करणाऱ्या रेल्वे पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांचे वेतन रोखण्याचे आदेश आहेत. खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे सुट्टी घेतल्यामुळे त्याचा ताण ड्युटीवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर येतो. हे टाळण्यासाठी हा प्रशासकीय निर्णय घेण्यात आला आहे. -रवींद्र सेनगावकर, आयुक्त, मुंबई रेल्वे पोलिस
डॉक्टर बनून वॉर्डबॉयने केले गर्भवतीवर उपचार

डॉक्टर बनून वॉर्डबॉयने केले गर्भवतीवर उपचार


पुणे :- परिसरातील येथील वॉर्डबॉयनेच डॉक्टर असल्याचे सांगून गर्भवती महिलेवर उपचार केले. परंतु, महिलेला जास्ता रक्तस्राव झाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेत बाळाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे त्याची प्रकृती नाजूक झाली. तीन दिवसांच्या उपचारानंतर बाळाचा मृत्यू झाला. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वडगाव शेरी येथील एका व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार हरी शंकर ठाकूर (वय ३६, रा. वडगाव शेरी)आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात ही घटना घडली असून धक्क्यातून सावरल्यानंतर त्यांनी ही तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार एका खासगी कंपनीत नोकरी करतात.

 त्यांची पत्नी आठ महिन्यांची गर्भवती होती. नऊ जून रोजी रात्री अचानक त्यांच्या पत्नीच्या पोटात दुखत असल्याने त्यांनी वडगाव शेरी येथील अनुप रुग्णालयात त्यांना दाखल केले. या ठिकाणी एक व्यक्ती डॉक्टरच्या वेशात होती. तक्रारदारांनी त्या व्यक्तीला तुम्ही डॉक्टर का, अशी विचारणी करून पत्नीच्या पोटात दुखत असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीने आपण डॉक्टर असल्याचे सांगून महिलेचा रक्तदाब तपासला. तो वाढल्याचे दिसले. त्या वेळी त्याने मोबाइलवरून कोणाला तरी फोनवर ही माहिती दिली. त्यानंतर मिळालेल्या सूचनांनुसार त्याने महिलेला तपासले. तपासणी केल्यानंतर महिला जोराने ओरडू लागली. त्या वेळी पत्नीने रक्तस्राव होत असल्याचे सांगितले. तरीदेखील 'डॉक्टर'ने त्याकडे दुर्लक्ष केले. काही वेळाने परत रक्तस्राव होत असल्याची माहिती दिली. या वेळी त्याने दोन गोळ्या घेण्यास सांगितले. एक गोळी महिलेने घेतली. मात्र, काही वेळातच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. त्या वेळी तो 'डॉक्टर' खूपच घाबरला.

 त्याने त्यांना तत्काळ दुसऱ्या रुग्णालयातील एका डॉक्टरांना फोन करून याची माहिती दिली. तसेच, महिलेला त्या ठिकाणी घेऊन जाण्यास पतीला सांगितले. रात्री एकच्या सुमारास तक्रारदार पत्नीला घेऊन त्या ठिकाणी गेले. त्या वेळी तेथील डॉक्टरांना माहिती देऊन तो 'डॉक्टर' निघून गेला. यानंतर दुसऱ्या रुग्णालयातील डॉक्टरने तक्रारदार यांना बाळाची प्रकृती नाजूक असून त्याला काचेच्या पेटीत ठेवावे लागेल, त्यासाठी जास्त खर्च होऊ शकतो, अशी माहिती दिली. तक्रारदार यांना जास्त खर्च परवडणार नसल्यामुळे त्या डॉक्टरने त्यांना कमांड हॉस्पिटलमध्ये पत्नीला दाखल करण्यास सांगितले. अशा अवस्थेत तक्रारदार यांनी पत्नीला पहाटे तीन वाजता कमांड हॉस्पिटलला दाखल केले. महिलेची परिस्थिती पाहून तेथील डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले. मात्र, रक्तस्राव जास्त झाल्याने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु, बाळाची प्रकृती नाजूक झाली होती. तीन दिवसांनी बाळाचा मृत्यू झाला, असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार यांनी पहिल्यांदा दाखल केलेल्या हॉस्पिटलमधील डॉक्टरची माहिती घेतली. त्या वेळी उपचार करणारी व्यक्ती डॉक्टर नसल्याचे त्यांना समजले.

 त्यानंतर त्यांनी तक्रार दिली असून चंदननगर पोलिस अधिक तपास करत आहेत. महिला धक्क्यामध्ये तक्रारदार यांचा विवाह २०११ झाला आहे. परंतु, त्यांना मूलबाळ होत नव्हते. अनेक ठिकाणी उपचार घेतले. त्यानंतर त्यांची पत्नी गर्भवती राहिली होती. अचानक पोटात दुखत असल्याने त्यांना तातडीने पतीने रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टर नसताना वॉर्डबॉने केलेल्या उपचारांनंतर रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या पत्नीला धक्का बसला असून पत्नीचीही प्रकृती नाजूक झाली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे.
‘टॅटू’मुळे अपात्र ठरलेल्या 'इच्छुक' जवानाला दिलासा

‘टॅटू’मुळे अपात्र ठरलेल्या 'इच्छुक' जवानाला दिलासा


 मुंबई :- उजव्या दंडावर ‘आई’ शब्दाचा टॅटू कोरल्याने केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) भरतीप्रक्रियेतून बाद ठरवण्यात आलेल्या इच्छुक जवानाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्याला मुलाखतीच्या प्रक्रियेत सहभागी होऊ देण्याचे निर्देश देऊन न्यायालयाने यासंदर्भात केंद्र सरकारला आज, ४ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत असलेल्या सुरक्षा दलांपैकी एक असलेल्या ‘सीएपीएफ’तर्फे ‘असिस्टंड कमांडंट’ पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू आहे. त्यात रवीकुमार कराड या उमेदवाराने सहभाग घेऊन लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी उत्तीर्ण केली. मात्र, ६ मार्चला वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला साडेसहा किलो वजन अधिक असल्याने आणि उजव्या हातावर ‘टॅटू’ असल्याने अपात्र घोषित करण्यात आले. त्यानंतर त्याने वजन घटवून ते प्रमाणात आणले आणि ‘टॅटू’ काढण्यासाठी ‘प्लास्टिक सर्जन’कडे ‘लेझर’ उपचार सुरू केले. त्याआधारे त्याने वै‌द्यकीय फेरतपासणीची विनंती केली. त्यानुसार केंद्र सरकारच्या ‘मेडिकल बोर्ड’ने १४ मे रोजी त्याची पुन्हा वैद्यकीय तपासणी केली. मात्र, ‘उजव्या दंडावर दोन सें.मी. आकाराचे टॅटू आहे’, असे कारण देत त्याला पुन्हा अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे त्याने अॅड. एस. पी. कदम यांच्यामार्फत उच्च न्यायालयात रिट याचिका केली. याविषयी न्या. रणजित मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने प्राथमिक सुनावणीअंती हा अंतरिम आदेश दिला.

‘टॅटूमुळे कर्तव्य बजावण्यात अडथळा येत नसल्याने पात्रतेच्या अन्य निकषांची पूर्तता करणाऱ्या एका उमेदवाराबाबत अपवाद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने पूर्वी दिले होते. शिवाय या प्रकरणात याचिकादाराच्या उजव्या दंडावर टॅटू असल्याने सलामी ठोकताना तो दिसण्याची शक्यता नाही. शिवाय गणवेशाच्या बाह्यातही तो सहज झाकून जाऊ शकतो. इतकेच नव्हे तर लेझर उपचारांनी टॅटू ९० टक्क्यांपर्यंत काढण्याचे त्याचे प्रयत्नही सुरू आहेत. त्यामुळे नियमभंग कसा होतो?’, असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला. तेव्हा, यासंदर्भात प्रतिज्ञापत्रावर म्हणणे मांडू देण्याची विनंती केंद्र सरकारच्या वकिलांनी केली. त्यामुळे खंडपीठाने कराड यांना अंतरिम दिलासा दिला.

काय आहेत टॅटूबद्दलचे नियम ?

आपला देश धर्मनिरपेक्ष असल्याने देशवासूयांच्या भावनांचा आदर करायला हवा. त्यादृष्टीने भारतीय लष्कराप्रमाणे धार्मिक प्रतिके किंवा प्रतिमा किंवा नाम अशा टॅटूंना परवानगी असेल. हे टॅटू हाताच्या आतील बाजूस असायला हवेत आणि केवळ डाव्या हातावर असायला हवेत. कारण सलामीसाठी तो हात वापरला जात नाही. जेणेकरून सलामी ठोकताना टॅटू दिसणार नाही. तसेच टॅटूचा आकार शरीराच्या त्या विशिष्ट भागाच्या (कोपर किंवा हात) एक चतुर्थांश इतकाच असायला हवा.
पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय

पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय


मुंबई :- मुंबई उच्च न्यायालयाने राज्यभराच्या पालकांना मोठा दिलासा दिला असून पालक शिक्षक कार्यकारी समितीस महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ या कायद्यान्वये शाळेचे जमा खर्चा पासून ते पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांवरील दरडोई खर्च ई. कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पुण्याच्या इंदिरा नॅशनल शाळेस दणका दिला आहे.

उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर इंदिरा नॅशनल शाळेस हा पुन्हा एकदा मोठा दणका देण्यात आला असून यापूर्वी काही वर्षांपूर्वी श्री.सतीश मुंदडा, सौ.मीरा दिलीप आदी पालकांनी दिलेल्या न्यायालयीन लढ्यानंतर शासनाच्या विभागीय शुल्क नियंत्रण समितीकडून शाळेची फी वाढ ही रु.६२०००/- वरून  थेट रु.५२०००/- इतकी कमी करण्याचा आदेश प्राप्त केला होता तसेच शाळेच्या प्रस्तावित रु.७२०००/- शुल्कवाढ रद्द करण्याचा आदेशही प्राप्त केला होता.याबाबत अधिक माहिती देताना श्री.सतीश मुंदडा यांनी सांगितले की, ‘आम्ही न्यायालयीन आदेशाचे स्वागत करीत असून या आदेशाने राज्यातील हजारो पालकांना फायदा होणार आहे.

महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क नियंत्रण अधिनियम २०११ अंतर्गत पालक शिक्षक कार्यकारी समितीस शाळेने कायद्याने बंधनकारक सर्व कागदपत्रे देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. शुल्क निर्धारण करण्याची ही पहिलीच पायरी असूनही शाळा हेतुपरस्पर अशी कागदपत्रे आम्हास उपलब्ध करीत नाहीत. ही कागदपत्रे पालकांना दिल्यास त्यांची नफेखोरी उघड होण्याची त्यांना भीती असल्याने त्यांनी कागदपत्रे दिली नव्हती. मात्र आता त्यांना न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित कागदपत्रे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.’

‘तसेच पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीतील कोणत्याही पालकाने शाळेच्या शुल्क प्रस्तावास नकार दिला तर तो त्या संपूर्ण शुल्क प्रस्तावास नकार ग्राह्य धरण्यात आला पाहिजे असे आमचे मत असून ते याबाबत आम्ही सक्षम अधिकारीकडून स्पस्ष्टीकरण घेणार आहोत’. असे श्री.मुंदडा यांनी सांगितले.

न्यायालयीन लढ्यात विजय प्राप्त केलेल्या पालकांनी सदर आदेश सोबत घेऊन प्रत्येक शाळेस अशी सर्व माहिती शुल्क निर्धारण करण्यापूर्वी पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीस उपलब्ध करून देण्यास भाग पाडावे असे आवाहन केले आहे. या याचिकेत पालकांची बाजू ॲड.रोनिता भट्टाचार्य यांनी मांडली.


  • उच्च न्यायालयाने नमूद केलेल्या आदेशाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे-

१) शुल्क निर्धारण करताना शाळा प्रशासनास पालक शिक्षक कार्यकारी समितीस दुर्लक्ष करता येणार नाही.
२) शाळा प्रशासनास एकतर्फी शुल्क निश्चिती करता येणार नाही. त्यांना महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ अंतर्गत पालक शिक्षक कार्यकारी समितीस बंधनकारक असलेली सर्व माहिती जसे की, नफा-तोटा, ऑडीट अहवाल, एनआरआय नागरिकांचे फंड, देणगी, मुलभूत सुविधा, प्रत्येक विद्यार्थीनुसार येणारा खर्च, इमारतीचे भाडे ई. माहिती देण्याची कायद्याची तरतूद बंधनकारक असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.
३) पालकांना शुल्क प्रस्तावासोबत दिलेली कागदपत्रे ही मूळ स्वरूपात पाहण्याचा अधिकार न्यायालयाने मान्य केला असून तो पालकांना शाळेच्या आवारातच पूर्वसूचनेनुसार उपलब्ध करून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
४) शाळा प्रशासनास पालक शिक्षक कार्यकारी समितीसमोर कायद्याने बंधनकारक असलेल्या तरतुदींचे पालन न करून एकतर्फी व मनमानी शुल्क आकारता येणार नाही.