शिवाजीराव
मंगळवेढ - येथील भीमा नदीच्या पात्रातून बेकायदेशीर वाळू उपसून शेतजमिनीत 68 हजार रूपये किमतीचा 17 ब्रास वाळूसाठा केल्याप्रकरणी सिध्दापूर गावचे विद्यमान सरपंच पती संतोष शिवानंद सोनगे यांच्याविरूध्द वाळूचोरी व पर्यावरणाचा र्हास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.संतोष शिवानंद सोनगे हे विद्यमान सरपंच पती असून त्यांनी भीमा नदीच्या पात्रातून जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसून ट्रॅक्टरच्या माध्यमातून गट क्र 69/2 मध्ये 68 हजार रूपये किमतीचा 17 ब्रास बेकायदा वाळूसाठा दि.13 डिसेंबर रोजी करून ठेवला होता. अज्ञात व्यक्तीने जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केल्यानंतर या वाळूसाठ्याचा पंचनामा करून साडेसहा लाख दंडाची कारवाईची नोटीस तहसिलदार यांनी संबंधितांना दिली होती. मात्र त्यावर कुठलाही दंड न भरल्यामुळे अखेर बोराळे विभागाचे मंडल अधिकारी जितेेंद्र बाबुराव मोरे यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर संतोष सोनगे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शाहूराज दळवी हे करीत आहेत. दरम्यान, खुद्द सरपंच पतीवर वाळूचोरीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली असून मंगळवेढ्याच्या इतिहासात प्रथमच वाळूचोरीचा गुन्हा सरपंच पतीवर झाला आहे. मागील सहा महिन्यापूर्वी सिध्दापूर येथील बेकायदा वाळूउपसा थांबविण्याकामी संतोष सोनगे यांनी पुढाकार घेवून सरपंच पत्नीला प्रांत कार्यालयासमोर उपोषण करून वाळू तस्करीविरूध्द एल्गार पुकारला होता. कांही दिवस गेल्यानंतर स्वतःच त्यांनी वाळूसाठा केल्याची खबर पंचक्रोशीत पसरल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने जिल्हाधिकार्यांकडे याबाबतची तक्रार केल्यानंतर या वाळूसाठ्याचे बिंग बाहेर पडले अन अखेर गुन्हा दाखल झाला.