![]() |
• परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सादरीकरण करुन केली योजनेची घोषणा
• आत्मसमर्पीत नक्षलवादी तरुणांना एसटीत मिळणार नोकरी, बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्पाचा शुभारंभ
मुंबई, दि. २० : शहीद जवानांच्या वारसांना पात्रतेनुसार एसटी महामंडळात नोकरी देणाऱ्या तसेच त्यांच्या पत्नींना आजीवन मोफत प्रवासाचा पास उपलब्ध करुन देणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भातील सादरीकरण करुन या योजनेची घोषणा केली. गडचिरोली जिल्ह्यातील आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी तरुणांना एसटी महामंडळात नोकरी उपलब्ध करुन देणाऱ्या बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्पाचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला. याशिवाय एसटी महामंडळाच्या इतर अनेक लोकोपयोगी योजनांचा शुभारंभ एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात आज झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला.‘स्लीपर शिवशाही’ आणि ‘लालपरी’चे लॉंचिंग
एसटी महामंडळातील बसेसचा आता चेहरा – मोहरा बदलत आहे. आजच्या कार्यक्रमात शयनयान (स्लीपर कोच) शिवशाही बसचे अनावरण करण्यात आले. तसेच परिवर्तन या साध्या बसचे ‘लालपरी’ हे नवीन डिझाईन तयार करण्यात आले असून त्याचेही अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
पनवेल बस पोर्टचे भूमीपूजन महामंडळामार्फत राज्यात विमानतळाच्या धर्तीवर १५ ठिकाणी अत्याधुनिक सोयी – सुविधांनीयुक्त बस पोर्ट उभी केली जाणार आहेत.
![]() |
![]() |
नक्षलवादी तरुणांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी एसटी योगदान देईल – दिवाकर रावते परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्प योजना सुरु करण्यासंदर्भात माहिती दिली. एका शिवसैनिकाची नक्षलवाद्यांकडून हत्या झाली असता त्यांनी गडचिरोलीतील त्या संबंधीत भागास भेट दिली होती, याची माहिती त्यांनी यावेळी दिली. नक्षलवादी तरुणांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणणे आवश्यक असून त्यासाठी एसटी महामंडळ योगदान देईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. देशाच्या सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांचे योगदान फार मोठे असते. त्यांच्या कुटुंबियांसाठी छोटेसे योगदान देत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना सुरु करीत असल्याची घोषणा यावेळी मंत्री श्री. रावते यांनी केली.
यावेळी एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द करण्यात आला.
यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार वारिस पठाण, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल आदी मान्यवर उपस्थित होते.
खटाबाई गोकुळ पाटील
Reply