Showing posts with label भंडारा. Show all posts
Showing posts with label भंडारा. Show all posts
भंडारा जिल्ह्यात कृषी पंपांना बारा तास वीजपुरवठा -चंद्रशेखर बावनकुळे

भंडारा जिल्ह्यात कृषी पंपांना बारा तास वीजपुरवठा -चंद्रशेखर बावनकुळे


 भंडारा :  विभागात कमी पाऊस व खंडीत पावसामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पिकांना संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने भंडारा जिल्ह्यासह नागपूर विभागातील सहा जिल्ह्यामध्ये कृषी पंपासाठी 12 तास थ्री फेज वीजपुरवठा देण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर येथे केली.
नागपूर विभागातील भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा व गडचिरोली या जिल्ह्यातील कमी व खंडीत पावसामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी पंपांना 12 तास थ्री फेज वीजपुरवठा करण्याची आवश्यकता असल्याबाबत संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी शिफारस केली होती. या शिफारसीनुसार कृषी पंपांसाठी दररोज 8 ते 10 तासाऐवजी 12 तास थ्री फेज वीजपुरवठा आवश्यकतेनुसार देण्याता येणार असल्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केले.
कृषी पंपांना 12 तास वीजपुरवठा करण्यासाठी राज्य विद्युत वितरण कंपनीने हा प्रस्ताव रितसर मंजूरीसाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर करण्यात आला असल्याचे सांगताना पालकमंत्री म्हणाले की, या निर्णयाची अंमलबजावणी 10 ऑगस्ट म्हणजे आजपासून सुरु करण्यात आली असून 12 तास वीजपुरवठा 10 ऑक्टोंबरपर्यंत सुरु राहणार आहे.
कृषी पंपांना वीजपुरवठा करण्याच्या निर्णयामुळे नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील 2 लक्ष 30 हजार ग्राहकांना होणार आहे. यासाठी सुमारे 70 कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे.
शेतकऱ्यांना 12 तास वीजपुरवठा करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भात सांगताना उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की महावितरण कंपनीने फीडरनिहाय वीजपुरवठ्याचा तपशील सादर करणे आवश्यक राहणार आहे. या कालावधीतील पुरवठा करण्यात येणारा वीजेची नोंद घेण्यात यावी तसेच यासाठी मोबाईल ॲपचा उपयोग करतानाच स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करुन ताळेबंद ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव, डॉ. पोतदार, माजी अध्यक्ष अशोक धोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

2 लाख 69 हजार रुपयांचा मुद्येमाल जप्त

2 लाख 69 हजार रुपयांचा मुद्येमाल जप्त

जाहिरात


भंडारा, दि. 24 : भंडारा-गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्रात पोट निवडणूक 28 मे 2018 रोजी होत असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यु काळे  यांच्या आदेशानुसार भंडारा निर्वाचन क्षेत्रात लोकसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने बनावट देशी, विदेशी मद्य व परराज्यातील अवैद्य दारु विक्री व उत्पादनाविरुध्द विशेष धडक मोहिम राबविण्यत आली.
जाहिरात
22 मे 2018 रोजी मौजा घोडेझरी ते पहेला कडे येणाऱ्या रोडवर खबरेच्या आधारे वाहतूक करीत असतांना एक सिलव्हर रंगाची टोयाटो कॉलिस जिचा आरटीओ क्र. एम.एच. 12 बि. व्ही. 3140 वाहन थांबविण्यात आले, असून तीच्या आतील भागात पाहणी केली असता गाडीच्या मागच्या बाजूला अवैध देशी दारुच्या अठरा खरडयाच्या खोक्यात  देशी 999 , देशी दारु टॅगो प्रीमीयम ब्राँडच्या 180 मीलीच्या एकूण 864 बॉटल्या भरुन असलेल्या चारचाकी वाहनासह एकूण 2 लाख 69 हजार 928 किंमतीचा मुद्येमाल  जप्त करुन महाराष्ट्र दारुबंदी कायदाचे  विविध कलमांतर्गत गुन्हयाची नोंद करण्यात आली.
या गुन्हयात  आरोपी गुरुदेव गुलाब नान्हे रा. मंडईपेठ अडयाळ यास महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 ए.ई. अंतर्गत अटक करण्यात आले आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक ज्ञानेश्वरी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे प्रभारी निरिक्षक एम.एल. मोहिते, सहाय्यक दुय्यम निरिक्षक ए.एच. कोटांगले, जे.ए. अंबुले व कर्मचारी एस.डी. गिऱ्हेपुंजे, मंगेश ढेंगे, संजय कोवेयांनी कारवाई पार पाडली. सदर गुन्हयाचा तपास  निरिक्षक एम.एल. मोहिते करीत आहेत.

जाहिरात
​अच्छे दिनाच्या नावाखाली फसवणूक करणा-या मोदी सरकारच्या पराभवाची सुरुवात भंडारा गोंदिया मधून करा - धनंजय मुंडे​

​अच्छे दिनाच्या नावाखाली फसवणूक करणा-या मोदी सरकारच्या पराभवाची सुरुवात भंडारा गोंदिया मधून करा - धनंजय मुंडे​



जाहिरात
भंडारा -- अच्छे दिनाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करणाऱ्या मोदी सरकारला धडा शिकवण्याची पहिली संधी देशात भंडारा गोंदिया येथील मतदारांना मिळाली आहे आहे . 28 मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवाराचा पराभव करून देशातील परिवर्तनाची सुरुवात भंडारा-गोंदिया तून करावी असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे

जाहिरात
भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे आघाडीचे उमेदवार श्री मधुकरराव  कुकडे यांच्या प्रचारार्थ भंडारा येथील किसान चौकात तसेच लाखनी येथे झालेल्या जाहीर सभेत श्री मुंडे बोलत होते .

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री श्री अनिल देशमुख राष्ट्रवादीचे प्रवक्ते  श्री नवाब मलिक, आमदार प्रकाश गजभिये , आमदार ख्वाजा बेग, माजी मंत्री रमेश बंग , माजी मंत्री बंडूभाऊ  सावरबांधे,  माजी मंत्री नानाभाऊ पंचबुद्धे ,माजी आमदार आनंदराव वंजारी, माजी आमदार सेवकभाऊ वाघाळे, प्रेमसागर धनवीर, ईश्वर बालबुद्धे आदींसह दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते.
जाहिरात

ही पोट निवडणूक निवडणूक मोदींच्या अहंकारामुळे आणि त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे होत असल्याचे मुंडे म्हणाले.  देशातील मोदी- शहा यांच्या यांच्या हुकूमशाही वाटचालीला पहिला विरोध श्री नाना पटोले यांनी केला. आज देशात प्रचंड महागाई वाढली आहे , 

अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची सातत्याने फसवणूक केली जात आहे . कर्जमाफी च्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली .शेतकऱ्यांच्या शेतमालाला  भाव मिळत नाही याच मतदारसंघात नव्हे तर संपूर्ण देशातील जनता त्यामुळे त्रस्त झाली आहे.  जनतेला हा राग आता आता व्यक्त करायचा आहे ती संधी देशात सर्वप्रथम भंडारा-गोंदिया येथील मतदारांना मिळाली आहे. 
जाहिरात

उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या  दोन जागांवर पराभव,  कर्नाटकमधील पराभव ही भाजपाच्या अस्ताची सुरुवात असून महाराष्ट्रातील त्याचा शुभारंभ या मतदारसंघाने करावा असे आवाहन त्यांनी केले. सरकारच्या धोरणाचा विरोध करणारे नाना पटोले हे जीगरबाज नेते असल्याचा उल्लेख त्यांनी केला.


ज्येष्ठ नेते माजी मंत्री श्री प्रफुल्ल पटेल हे देशातील  राजकारण करणारे नेते आहेत . देशातील कोणतीही घडामोड त्यांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशा या नेतृत्वाला जपण्यासाठी त्यांना बळ आणि ताकद देण्यासाठी या निवडणुकीत श्री मधुकर कुकडे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
             
आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा -- अभिमन्यु काळे

आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा -- अभिमन्यु काळे




  •  मतदान केंद्र निश्चित करा
  •  एसएसटी व व्हिडिओ पथक नेमा
  •  रोख व दारु वाहतुकीवर नियंत्रण ठेवा

भंडारा, दि. 8 :- भंडारा-गोंदिया लोकसभा पोट निवडणूकीसाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत 10 मे 2018 असून उमेदवारी अर्ज दाखल झाल्या दिवसापासून उमेदवारांसाठी असलेल्या आदर्श आचार संहितेची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी  अभिमन्यु काळे यांनी दिले. भंडारा व गोंदिया जिल्हयात रोख वाहतुक व दारु वाहतुकीवर कडक  निर्बंध घालण्याच्या सूचना पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूकीसंबंधी आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
भंडारा जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, गोंदिया जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भूजबळ, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे,उपजिल्हाधिकारी निवडणूक विलास ठाकरे, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसिलदार या बैठकीस उपस्थित होते.
दोन्ही जिल्हयात असलेल्या मतदान केंद्राचा आढावा घेवून केंद्र निश्चित करण्यात यावेत. यात संवेदनशिल, अतिसंवेदनशिल व व्हलरनेबल मतदान केंद्राची निश्चिती करण्यात यावी, अशा सूचना काळे यांनी दिल्या. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी स्ट्रांग रुम तयार करण्यात यावी. स्टॅटिक्स सर्व्हेलन्स टिम व व्हिडिओ पथक नेमन्यात यावे. निवडणूकीच्या निमित्ताने अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सभा होत असतात. ही बाब लक्षात घेता सभेसाठी लागणाऱ्या परवानग्यासाठी एक खिडकी योजना राबवावी. सभेच्या परवानगीची एक प्रत जिल्हा निवडणूक शाखेकडे पाठवावी.
सभेची परवानगी देतांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य हे धोरण राबवावे. अतिमहत्वांच्या व्यक्तींसाठी हेलीकॉपटरची परवानगी आवश्यक असल्यास त्या अनुषंगाने परवानगी दयावी, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे विनापरवानगी सभा व रॅली निघणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. निवडणूक प्रचारासाठी अनेक पक्ष पॉम्पलेट व हँडबील प्रकाशित करतात त्यावर मुद्रक प्रकाशकाचे नाव असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या तारखा निश्चित करुन तात्काळ प्रशिक्षण घ्यावे. यामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे प्रशिक्षण योग्य प्रकारे देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. निवडणूक निरिक्षक 10 मे रोजी दाखल होणार असून काही मतदार केंद्रांना भेटी देणार आहेत. मतदान केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात. निरिक्षक या सुविधांची तपासणी करणार असून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
प्रत्येक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वाहतुक आराखडा तयार करावा, अशा सूचना काळे यांनी दिल्या. निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात यावी. आचार संहिता भंग झाल्यास तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा. आचार संहितेच्या गुन्हयासाठी पोलीस विभागाने स्वतंत्र नोंदवही ठेवावी, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने काम करण्यात यावे, असे ते म्हणाले. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे यांनी समाजिक न्याय भवन येथे भेट देवून मतमोजणीसाठीच्या जागेची पाहणी केली.

 संकल्प समतेचा ” चित्ररथाचा शुभारंभ

संकल्प समतेचा ” चित्ररथाचा शुभारंभ



भंडारा, :- जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांवर आधारीत “संकल्प समतेचा” या चित्ररथाचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, उप वनसंरक्षक विवेक होशिंग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी काशीनाथ तरकसे, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर व जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते प्रामुख्याने उपस्थित होते. संकल्प समतेचा हा चित्ररथ जिल्हयात सर्वदूर फिरणार असून सामाजिक न्याय विभागाच्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, कन्यादान योजना, अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, मुलामुलींसाठी शासकीय वसतीगृह,

मागेल त्याला प्रशिक्षण योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, रमाई घरकुल योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनाचा पुरवठा करणे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलामुलींसाठी निवासी शाळा इत्यादी योजनांची प्रसिध्दी गावोगावी करणार आहे. नागरिकांनी या योजनांची माहिती घेवून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे यांनी केले आहे. 
लघु गटांकडून 150 कोटीचा प्रारुप आराखडा प्रस्तावित

लघु गटांकडून 150 कोटीचा प्रारुप आराखडा प्रस्तावित


भंडारा, दि.19 :- जिल्हा वार्षिक योजना सन 2018-19 साठी सर्वसाधारण योजना 86 कोटी 76 लाख, अनुसूचित जाती उपयोजना 49 कोटी 17 लाख व आदिवासी उपयोजना 14 कोटी 16 लाख असे एकूण 150 कोटी 9 लाख रुपयांचा प्रारुप आराखडा लघुगटांकडून प्रस्तावित करण्यात आला. आमदार राजेश काशिवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज लघुगटांची बैठक घेण्यात आली. याबैठकीत हा आराखडा प्रस्तावित करण्यात आला. जिल्हाधिकारी सुहास दिवसे, सहाय्यक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.,विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूरचे सदस्य डॉ. कपिल चंद्रायन व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्रीमती जया यशवंत सोनकुसरे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलतांना आमदार राजेश काशिवार म्हणाले की, कोल्हापूरी बंधाऱ्याच्या बांधकाम दुरुस्तीसाठी उपलब्ध होणाऱ्या निधीतून साईट उपलब्ध असल्यास नवीन कोल्हापूरी बंधाऱ्याचे बांधकाम प्रस्तावित करण्यात यावेत. प्रस्तावित आराखडयात अंगणवाडी बांधकाम, शौचालय व अंगणवाडी दुरुस्ती यासाठी निधी प्रस्तावित आहे. जिल्हयातील 23 पुनर्वसित गावात प्राधान्याने अंगणवाडी बांधकाम घ्यावे, असे त्यांनी सांगितले. शाळांच्या इमारती व वर्गखोल्यांची अवस्था चांगली नसून या खोल्यांचे बांधकाम करणे आवश्यक आहे. जिल्हयातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांची सद्यस्थिती यावर शिक्षण विभागाने पालकमंत्री यांचे समोर सादरीकरण करावे, असे काशिवार यांनी सांगितले. या कामासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
यासोबतच आरोग्य व जनसुविधा या क्षेत्राच्या विकासासाठी सुध्दा अतिरिक्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. अपारंपारीक ऊर्जा विकासासाठी असलेल्या तरतूदीमधून न्यायालय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, क्रीडा संकुल व कारागृह इमारत टप्प्याटप्याने सौर उर्जेवर आणण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. प्रस्तावित आराखडयात जिल्हा कारागृहात कैदयांची नातेवाईकांसोबत भेटीसाठी विशेष सुरक्षित कक्ष बनविणे प्रस्तावित आहे. कारागृहात असलेल्या नक्षल कैदयांसाठी वेगळी व्यवस्था निर्माण करण्याचे नियोजित आहे. दुग्ध उत्पादन, रेशिम उत्पादन, मत्स्य व्यवसाय, जनसुविधा, आरोग्य व शिक्षण या 6 क्षेत्रात प्राधान्याने काम करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. या क्षेत्राचा विकास डोळयासमोर ठेवून प्रत्येक विभागाने नियोजन करावे, असे ते म्हणाले. या बैठकीत कौशल्य, विकास, क्रीडा विकास, मागासवर्गीयांचे कल्याण, तांडा विकास, पेयजल आणि पाणीपुरवठा, नगरविकास, जलयुक्त शिवार, वन व वन्यजीव, पूरनियंत्रण, भंडारा शहरातील सिंग्नल तसेच सीसीटिव्ही आदी विकास कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन समिती सदस्या जया सोनकुसरे यांनी गणेशपूर ग्रामपंचायतमध्ये जागा उपलध असून त्या ठिकाणी तालुका क्रीडा सकुलाची मागणी उपस्थित केली. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी भेट देवून पाहणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी केल्या. बैठकीचे संचलन जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यांनी केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 
यशाचेच नाही तर अपयशाचेही शिलेदार बना आ. अवसरे

यशाचेच नाही तर अपयशाचेही शिलेदार बना आ. अवसरे


भंडारा, दि.19 :- प्रत्येकालाच जीवन जगतांना स्पर्धेला सामोर जावे लागते. विद्यार्थी म्हणून जीवन जगतांना नानाविध स्पर्धा द्याव्या लागतात. स्पर्धेच्या या युगात कुणी जेता तर कुणाच्या वाटयाला अपयश येते. सर्वच जिकंणारे असतात असे नाही, जेता असतो तो आपल्या विजयाचा जल्लोष साजरा करतो. परंतु अपयशी होणारा जल्लोष करीत नाही. यापुढे ही मानसिकता बदलली पाहिजे. अपयशी होणाऱ्यानेही आनंद साजरा करायला हवा, कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे, असे प्रतिपादन आमदार. रामचंद्र अवसरे यांनी केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय भ्ंडाराद्वारा आयोजित चाचा नेहरु बाल महोत्सवात उदघाटनपर भाषणात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बालक हा वातावरणातून घडत असतो, बालकाच्या शारिरिक, बौध्दीक व मानसिक विकासासाठी सुयोग्य वातावरण मिळणे आवश्यक आहे. शासकीय व स्वयंसेवी संस्थेमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार बालकांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तीन दिवसीय बाल महोत्सावाचे आयोजन स्थानिक शिवाजी स्टेडियम भंडारा येथे करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी बालकांना खेळाचे महत्व पटवून देत बाल महोत्सवात सर्वांनी संघ भावना निर्माण करुन खेळाडू वृत्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
 अध्यक्ष बाल कल्याण समिती भंडारा डॉ. विशाखा गुप्ते यांनी उपस्थित मुलांशी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधला. बालगृहात पुनर्वसनासाठी दाखल विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. स्वयंसेवी संस्थांच्या संचालकांवर फार मोठी जबाबदारी असून त्यांना चोविस तास पालकांची भूमिका बजवावयाची आहे. निराधार, अनाथ मुलांवर संस्कारांची उणीव भासायला नको, विकासाची नवी संधी त्यांना या बाल महोत्सवातून प्राप्त होवो, असा आशावाद त्यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केला. तत्पूर्वी प्रास्ताविकातून बाल महोत्सव अयोजन करण्यामागचे उद्दिटय व महत्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद डाबेराव यांनी पटवून दिले. यावेळी मंचावर जिल्हा परिविक्षा अधिकारी ए.ए. भोयर, सहाय्यक लेखा अधिकारी पी.ए. गिरडकर, नागपूरचे परिविक्षा अधिकारी एच.आर. सवई उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संरक्षण अधिकारी सी.एच. लोथे व शुभांगी कोल्हे यांनी केले. तर आभार प्रदर्शन संरक्षण अधिकारी विलास भेंडारकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीविक्षा अधिकारी एम.एम. आंबेडोरे, संरक्षण अधिकारी एस.डी. माहुरे, विधी सल्लागार एस.एल. धानकुटे, डी.बी. महाकाळकर, डी.डी. रंगारी, आर.आर. बोकडे, संरक्षण अधिकारी अमित गजभिये, नितीन साठवणे, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सर्व कर्मचारी तथा तालुकास्तरावरील संरक्षण अधिकारी कार्यालयातील सहाय्यक व डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला बालक व स्वयंसेवी संस्थांचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते. 
महाकर्जमाफी : प्रलंबित अर्जदारांनी बँक शाखांशी संपर्क साधावा - बीडीसीबी बँकेच्या सूचना फलकावर यादया जाहिर

महाकर्जमाफी : प्रलंबित अर्जदारांनी बँक शाखांशी संपर्क साधावा - बीडीसीबी बँकेच्या सूचना फलकावर यादया जाहिर

भंडारा, दि.19 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अर्जदारांची माहिती व बँकेकडील माहिती यांचा काही प्रकरणात ताळमेळ लागत नाही. असे अर्जदार शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी या शेतकऱ्यांच्या यादया भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संपूर्ण 46 शाखांच्या सूचना फलकांवर लावण्यात आल्या आहेत. अर्जदार शेतकऱ्यांनी यादीत आपले नावाची शहनिशा करुन पुढील कार्यवाहीसाठी शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधावा, असे आवाहन सरव्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडारा यांनी केले आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 चा महाराष्ट्र शासनाच्या योजनेंतर्गत भंडारा जिल्हयातील शेतकऱ्यांनी दाखल केलेले अर्ज व योजनेच्या निकषानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी त्यांच्याकडे असलेल्या कर्ज खात्याची माहिती सादर केलेली होती. या योजनेंतर्गत दाखल केलेले ऑनलाईन अर्ज, अनुषंगिक माहिती व बँकेच्या स्तरावर उपलब्ध असलेल्या माहितीची सांगड घालून त्यांचेवर संगणकीय प्रक्रिया करण्यात आली होती व या प्रक्रियेत जे अर्जदार या योजनेंतर्गत पात्र ठरले त्या शेतकऱ्यांना शासनाकडून प्राप्त झालेल्या ग्रिन लिस्ट प्रमाणे कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ देण्यात आलेला आहे. तसेच त्यानुसार या जिल्हयात योजनेची अंमलबजावणी सुरु आहे.परंतु ही कार्यवाही करत असतांना अर्जदाराची माहिती व बँकेकडील उपलब्ध असलेली माहितीमध्ये ताळमेळ घालणे शक्य नसल्याचे आढळून आल्याने व असे अर्जदार शेतकरी या योजनेंतर्गत लाभापासून वंचित राहू नये, या करीता त्यांची पात्रता व अपात्रता निश्चित न झाल्याप्रकरणी कार्यपध्दती अवलंबवयाची आहे. त्यास अनुसरुन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ताळमेळ होवू न शकणारी यादी प्राप्त झाली असून त्या याद्या जिल्हयातील भंडारा मध्यवर्ती सहकारी बँकेतील संपूर्ण 46 शाखांच्या सूचना फलकावर जाहिर करण्यात आलेल्या आहेत. संबंधित बँक शाखेला संलग्न असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या या योजनेंतर्गत अर्ज केलेल्या अर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित शाखा व्यवस्थापक यांचेशी साधावा. याबाबत जिल्हयातील अर्जदार शेतकऱ्यांना याद्वारे अवगत करण्यात येत आहे.जिल्हयातील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या अर्जदार शेतकऱ्यांनी शाखा स्तरावर जाहिर केलेल्या यादीमध्ये आपल्या नावाची शहानिशा करुन पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधित शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधावा, असे आवाहन सरव्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडारा यांनी केले आहे.