Showing posts with label ठाणे. Show all posts
Showing posts with label ठाणे. Show all posts
अरे व्वा! पासपोर्टसाठी घरबसल्या पडताळणी

अरे व्वा! पासपोर्टसाठी घरबसल्या पडताळणी


ठाणे :-  पासपोर्ट मिळविण्यासाठी पोलिस पडताळणीची प्रक्रिया ही अनेकदा त्रासदायक ठरते. पोलिस ठाण्यात अनेक हेलपाटे मारावे लागतात. वेगवेगळी कागदपत्रे आणि साक्षीदारांसाठी सक्ती केली जाते. त्यानंतरही पोलिस निर्धारीत वेळेत हा अहवाल पासपोर्ट कार्यालयात पाठवतीलच, याची शाश्वती नसते. पोलिसांकडून होणारी ही 'मनमानी' बंद करण्याचे आदेश जारी झाले आहेत. अर्जदाराला पोलिस ठाण्यात न बोलावता त्याच्या घरी जाऊन पडताळणी करावी, आवश्यक कागदपत्रांचे स्कॅनिंग करून ते टॅबद्वारे अपलोड करावीत, अनावश्यक कागदपत्रे आणि साक्षीदारांची सक्ती करू नये, असे आदेश ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत.

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दरवर्षी सुमारे एक लाख रहिवासी पासपोर्टसाठी अर्ज करतात. अर्जदाराने दिलेल्या माहितीची सत्यता पडताळणी आणि गुन्हे दाखल असतील तर त्याबाबतची माहिती पोलिसांकडून संकलित केली जाते. पासपोर्ट कार्यालयाकडून अर्ज आल्यानंतर होणारी ही पोलिस पडताळणी वादग्रस्त ठरत असून निर्धारीत वेळेत पडताळणी होत नसल्याने पासपोर्ट मिळविण्यात अनेकदा विलंब होतो. ती गैरसोय टाळण्यासाठी ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेचे उपायुक्त एस. एस. बुरसे यांनी सर्व पोलिस ठाण्यांना एक परिपत्रक धाडले असून त्यात पासपोर्ट पडताळणी संदर्भातील कार्यपध्दती स्पष्ट करण्यात आली आहे.

अर्जदार आणि त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाची पडताळणी करण्यासाठी मतदान कार्ड, सर्व्हीस फोटो आयडी, जात प्रमाणपत्र, निवृत्तीवेतनसंबंधी पेपर, जुना पासपोर्ट, पॅनकार्ड, शस्त्र परवाना, बँक पासबुक, मान्यताप्राप्त कॉलेज किंवा विद्यापीठाचे ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, जन्मदाखला, रेशनकार्ड या १२ पैकी नाव व पत्ता नमूद असलेले कोणतेही दोन पुरावे गरजेचे असतात. आधार कार्ड असल्यास अन्य कोणत्याही ओळखपत्राची गरज नसते. मात्र, त्यानंतरही पोलिस जन्मस्थळ दाखला, भाडेपावती, वीजबिल आदी अनावश्यक कागदपत्रांची सक्ती अर्जदाराकडे करतात. अनेक ठिकाणी सोसायटीकडूनही वास्तव्याचे पुरावे मागितले जातात. परंतु, १२पैकी दोन कागदपत्रांशिवाय अन्य कोणत्याही कागदपत्राची मागणी करू नये, असे बजावण्यात आले आहे. अर्जदारांस दोन साक्षीदारांसह पोलिस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितले जाते. असे कोणतेही साक्षीदार बोलावून त्यांचे जबाब नोंदवून घेऊ नयेत. तसेच, अर्जदारांना पोलिस ठाण्यात न बोलावता पोलिसांनीच अर्जदाराच्या घरी जात प्रत्यक्ष पडताळणी करावी. तिथेच आवश्यक कागदपत्रे आणि फोटो स्कॅन करून टॅबव्दारे अपलोड करावेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. जीपीआरएस सिस्टिमव्दारे राहत्या पत्त्याची खात्री करावी आणि अर्जदाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतची पडताळणी करण्यासाठी क्राइम अॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अॅण्ड सिस्टिमचा (सीसीटीएनएस) वापर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सात दिवसांत अहवाल .
पडताळणी प्रक्रियेस लागणारा कालावधी कमी करून नागरिकांची गैरसोय टाळा, असे या आदेशात स्पष्ट बजावण्यात आले आहे. पासपोर्ट पडताळणी पोलिस ठाण्यांच्या पातळीवर सात दिवसांत पूर्ण करावी, अर्जदाराबद्दल संशय असेल किंवा अर्जातली माहिती चुकीची आढळली असेल, तर तसे अर्ज तात्काळ माघारी धाडावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
५० टक्के लोकांना लागलीय पेनकिलरची सवय!

५० टक्के लोकांना लागलीय पेनकिलरची सवय!


 ठाणे :- एकीकडे सरकार एकापेक्षा अधिक औषधी घटक मिळून तयार केलेल्या एकाच 'फिक्स डोस कॉम्बिनेशन'वर (एफडीसी) बंदी आणण्यासाठी प्रयत्न करत असतानाच, दुसरीकडे ठाण्यातील ५० टक्क्यांहून अधिक लोकांना पेनकिलरची प्रचंड सवय लागली असल्याचे निरीक्षण ठाणे जिल्हा मेडिकल असोसिएशनने नोंदविले आहे.

फिक्स डोस कॉम्बिनेशनच्या औषधांवर केंद्र सरकारने बंदी आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास फेंसेडिल, सॅरिडॉन, डी-कोल्ड, टोटलसारख्या सुमारे ३४३ औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी येईल. हा निर्णय ठाणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगला असला तरी सध्या ठाण्यातील ५० टक्क्यांहून अधिक लोक हे 'सेल्फ मेडिकेशन' घेत असल्याचे जिल्हा मेडिकल असोसिएशनचे म्हणणे आहे.

दररोजच्या घरगुती कामाबरोबरच ऑफिसचा तणाव आणि त्यात लोकलमधून करावा लागणारा धावपळीचा प्रवास यामुळे सततच्या दुखण्यावर पेनकिलरचा पर्याय निवडला जात आहे. डोकेदुखी, पाठदुखी, दाढदुखी किंवा अंगदुखीवर सर्रास पेनकिलर घेतले जाते. पेनकिलर घेण्याचे प्रमाण कष्टकरी कामगार आणि महिलांमध्ये सर्वाधिक असल्याचेही वास्तव पुढे आले आहे.

सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी यांसारख्या आजारांवर स्वत:च औषध घेण्याचे प्रमाण हे ५० टक्क्यांहून अधिक आहे. कामगारवर्ग आणि महिलांमध्ये पेनकिलर गोळ्या घेण्याची सवय लागली आहे. या गोळ्यांच्या दुष्परिणामांबाबत हे लोक अनभिज्ञ आहेत. 
-संजय धनावडे, अध्यक्ष, जिल्हा मेडिकल असोसिएशन

पेनकिलर सातत्याने घेतल्यास आतड्यांवर परिणाम होतो. उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेली व्यक्ती सतत पेनकिलर घेत असल्यास त्या व्यक्तीच्या मूत्रपिंडांवर परिणाम होऊन ती निकामी होण्याची शक्यता अधिक असते.
-डॉ. आर. बी. कुलकर्णी, माजी जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
भिवंडीत सतत रडणाऱ्या मुलाची आईकडून हत्या

भिवंडीत सतत रडणाऱ्या मुलाची आईकडून हत्या


 ठाणे :- अवघ्या सहा महिन्याच्या मुलाची त्याच्या आईनेच नाल्याच्या पाण्यात बुडवून हत्या केल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील कासपाडा भागात घडली आहे. मुलगा सारखा रडून त्रास देत असल्याने, तसेच तीही सारखी आजारी पडत असल्याने रागाच्या भरात हे कृत्य केल्याची कबुली तिने पोलिसांना दिली. कल्पना नीलेश गायकर (२५) असे या आईचे नाव असून पोलिसांनी तिच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवून तिला अटक केली आहे.

भिवंडीतील धापसीपाड्यामध्ये कल्पना ही पती आणि दोन मुलांसह राहते. लहान मुलगा ऋषभ (६ महिने) याचा बुधवारी अचानक मृत्यू झाला होता. भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात ऋषभचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे स्पष्ट झाले. साक्षीदारांनी दिलेल्या साक्षींनंतर, पोलिसांनी कल्पना हिच्याकडे चौकशीचा फेरा वळवला. त्यात आपणच ऋषभची पाण्यात बुडवून हत्या केल्याची कबुली तिने पोलिसांना दिली.
लाख मराठा, शिस्तबध्द मराठा सांगलीच्या स्टेशन चौकात ठिय्या आंदोलन

लाख मराठा, शिस्तबध्द मराठा सांगलीच्या स्टेशन चौकात ठिय्या आंदोलन



सांगली : ‘तुमचं-आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ अशा घोषणा देत गुरुवारी सांगलीतील स्टेशन चौकात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. शहरासह परिसरातील गावांतून आलेले मराठा समाजबांधव व महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सायंकाळी पाचपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच होते. शांत व संयमाने झालेल्या या ठिय्या आंदोलनामुळे मराठा समाजाने मूक मोर्चानंतर पुन्हा एकदा शिस्तीचे दर्शन घडविले.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी क्रांतिदिनी संपूर्ण राज्यभर बंद व ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. सांगलीतही संपूर्ण व्यवहार बंद होते. सकाळी दहा वाजता सकल मराठा समाजाच्यावतीने शहरातून मोटारसायकल रॅली काढून कार्यकर्ते ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील स्मारकासमोर समाजबांधव मोठ्या संख्येने जमा होत होते. पश्चिम भागातील काही गावांतून आलेले तरुणही मोटारसायकल रॅलीने सहभागी होत होते स्टेशन चौकात आलेल्या समाजबांधवांनी रस्त्यावरच ठिय्या मारला होता; तर अनेकजण आजुबाजूला थांबले होते. मात्र, ठिय्या आंदोलनात सहभागी महिलांनी ठिय्या आंदोलन असल्याने खाली बसण्याचे आवाहन केल्यानंतर सर्वजण खाली बसले. आंदोलनादरम्यान वारंवार पावसाच्या सरी सुरू होत्या. पावसाची तमा न बाळगता मराठा समाज बांधव बसून होते. दिवसभरात चार ते पाचवेळा पावसाच्या सरी आल्या; परंतु ठिय्या आंदोलन कायम होते सकाळपासून सायंकाळी पाचपर्यंत चाललेल्या या ठिय्या आंदोलनात कुणीही भाषण केले नाही. तसेच उपस्थितांना सूचना देण्याची व घोषणा देण्याची सूत्रेही महिलांनी स्वत:कडे घेतल्याने आंदोलन शिस्तीत पार पडले. आंदोलनामुळे चौकात होणारी गर्दी लक्षात घेऊन आझाद चौकापासून राजवाडा चौकाकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी बंद केली होती. दुपारनंतर ही वाहतूक सुरळीत झाली होती.यावेळी आपल्या मागण्यांचे एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यास शिष्टमंडळ जाणार होते, मात्र जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील हे स्वत: शहरात फिरून आंदोलनाचा आढावा घेत होते. त्यामुळे आंदोलनस्थळीच त्यांना उपस्थित महिलांनी निवेदन सादर केले. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी यावेळी दिले.
 यावेळी डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर, महेश खराडे, नितीन चव्हाण, प्रशांत भोसले, श्रीरंग पाटील, पद्माकर जगदाळे, आशा पाटील, सुजाता भगत, सुप्रिया घाडगे, प्रिया गोटखिंडे, कविता बोंद्रे, सुवर्णा माने, रूपाली राऊत, संगीता शिंदे, स्नेहा सावंत, रोहिणी पाटील यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.