![]() |
नीलेश सूखसोहळे
- बेटी बचाओ, बेटी पढाओचा करण्यात येणार प्रचार
- महिला शक्तीव्दारे मोर्णाची केली जाणार स्वच्छता
- मोर्णा स्वच्छता मोहिमेत विदयार्थीनी,
- महिलांनी सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
अकोला, दि. 31:- पर्यावरणाच्या रक्षणासाठी दर महिन्याच्या एक तारखेला सायकल डे साजरा करण्याचा उपक्रम जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सुरु केला आहे. उदया दि. 1 फेब्रुवारी 2018 रोजी स्वत: जिल्हाधिकारी सकाळी 8.00 वाजता आपल्या बंगल्यावरुन सायकलने मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहेत. यावेळी बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा देत या मोहिमेत विदयार्थीनी, शासकीय कार्यालयातील सर्व महिला कर्मचारी व इतर महिलांचाही सहभाग राहणार आहे. मोहिमेतंर्गत सर्वजण गीता नगर भागातून वाहणाऱ्या मोर्णा नदी काठी स्वच्छतेसाठी एकत्र येणार आहेत. या मोहिमेत जास्तीत जास्त विदयार्थीनी आणि महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरण हे दिवसेंदिवस दुषित होत आहे. पर्यावरणाचा होणारा हा ऱ्हास रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरेजेचे आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सायकल डे मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी प्रत्येकाने दैनंदिन कामकाजासाठी केवळ सायकलचाच वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.यापूर्वी या मोहिमेला अधिकारी, कर्मचाऱ्यांसह जनतेनेही उर्त्स्फुत प्रतिसाद दिला. उदया दि. 1 फेब्रुवारी 2018 रोजी देखील जनतेने कुठल्याही स्वयंचलित वाहनाचा उपयोग न करता सायकलचाच वापर करावा. जेणेकरुन पर्यावरण रक्षणाबरोबरच आरोग्यही सुदृढ राहिल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सायकल डे च्या माहिमेत विदयार्थीनी आणि महिलांसह सर्वांनी सहभागी व्हावे,असे जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.