- दारूल उलूम मदरसा येथे ईद मिलन सोहळा.
मुर्तीजापुर :- जिवन जगत असताना वाईट मार्गाकडे वळणारी पावले चांगल्या रस्त्यावर आणण्या करिता आपण सर्व मिळून कार्य केल्यास देशाचे भविष्य आणखी उज्ज्वल होऊ शकते. आपल्या देशासारखे दयाळू व प्रेमळ लोक जगात नाही.आपण सर्व एकाच देवाची लेकरे आहोत. मस्जिद मध्ये कोणीही येऊन प्रार्थना करू शकतो.मस्जिद हे ईश्वराचे घर आहे.
येथे पवित्र मनाने येणाऱ्या कोणालाही मनाई नाही. आपण एकाच परिवारातले असून सामाजिक एकात्मतेचा संदेश जनमानसात जाण्याकरिता दारुल उलूम मदरसा येथे सामूहिक ईद मिलन कार्यक्रम ठेवून बंधुता जोपासण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना देशाचे चांगली नागरिक व्हावे म्हणून शक्य ते सर्व काही शिक्षण दिले जाते असे प्रतिपादन मदरसा दारुल उलूम वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी सोनारीचे अध्यक्ष मुक्ती मोहम्मद रोशन शाह कासमी यांनी केले.ते मदरसा येथे आयोजित ईद मिलन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. ईद मिलन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी अभय सिंह मोहिते पाटील, काझी नाजिमुद्दिन उर्फ आगा मौलाना(मलकापूर), शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे, ग्रामीणचे ठाणेदार शेख रहीम, नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ, नायब तहसीलदार वैभव फरताडे,पोलीस उपनिरीक्षक शेख यांची उपस्थिती होती. यावेळी विचार व्यक्त करतांना आगा मौलाना यांनी पवित्र कुराणाचे महत्त्व समजावून सांगितले.
उपविभागीय अधिकारी मोहिते यांनी सांगितले की, जीवनात शिक्षणाचे फार मोठे महत्त्व असून महान वैज्ञानिक डॉक्टर अब्दुल कलाम हे अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षणाच्या बळावर राष्ट्रपती पदापर्यंत परिश्रम घेऊन पोहोचले. त्यांचा आदर्श आपण सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून समाज आणि देशाच्या विकासाकरिता हातभार लावावा. तर ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांनी सांगितले की, मूर्तिजापूर तालुक्यातील सोनारी येथील दारुल उलूम मदरसा सतत सामाजिक सामाजिक कार्यात अग्रेसर असून मदरसा तर्फे दवाखाना, अनाथ व गरीब मुलांचे मोफत शिक्षण व संगोपन, पाणीटंचाईच्या काळात तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना मोफत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा असे विविध समाजोपयोगी सामाजिक उपक्रम मदरसा कडून राबविल्या जातात. आणि त्यातूनच खरा एकतेचा संदेश कृतीतून दिला जातो.
त्यांचे कार्य प्रशंसनीय आहे यापासून इतरांनी देखील बोध घेतला पाहिजे.अप्रिय गोष्टींना बळी न पडता एकता जोपासली पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मास्टर जहुर अहमद यांनी केले. मदरशातील तीन विद्यार्थ्यांनी 'मेरे प्यारे वतन, तू सलामत रहे' हे देशभक्तीपर गीत गायन करून उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याला सर्व स्तरातील मान्यवर, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, समाज सेवक, नगरसेवक, सरपंच, गावकरी यांची उपस्थिती होती, या सोहळ्याचे आभार हाफिज नवेद यांनी व्यक्त केले.सर्व उपस्थितीतांनी शिरखुरम्याचा लाभ घेतला. उपस्थितांना आपली ठेव आपल्या सेवेत हे पुस्तक भेट देण्यात आले.