लोहारा/प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने बार्टीचे महासंचालक श्री कैलास कणसे (भा.प्र.से.), मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे, सहाय्यक प्रकल्प संचालिका सुजाता पोहरे, प्रकल्प अधिकारी तुषार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा तालुक्यातील वडगांव (गां) येथे दि. 3 जानेवारी रोजी शिक्षण सम्राज्ञा सावित्रीआई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी समतादूत नागेश फुलसुंदर यांनी माता सावित्रीबाई फुले यांचे विचार मांडले.
ते म्हणाले की, सावित्रीबाईंचे संपूर्ण आयुष्य समाजासाठी गेले. त्यांनी मुलींना शिकवलं, शाळा काढल्या, सर्व जाती धर्माच्या आणि गोरगरिबांच्या दिन दुबळ्या समाजातील मुलींना शिक्षण दिले. आज आंगणवाडीच्या कार्यकर्तीपासून ते अंतराळात गगनभरारी घेणाऱ्या कल्पना चावला पर्यंतच्या मुलींना सावित्रीबाईंनी शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याध्यापक एस.जे.चंदनशिवे यांनी मनोगत व्यक्त करुन त्यांनी सावित्रीबाईंनी केलेले अद्वितीय कार्य स्पष्ट केले. यावेळी शिक्षण सम्राज्ञा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमीत्त समतादूत नागेश फुलसुंदर व सामाजिक कार्यकर्ते तुकाराम साळुंके यांच्या वतीने शाळेतील मुलींना शालेय साहित्य भेट देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच बबन फुलसुंदर, उपसरपंच लक्ष्मण भुजबळ, ग्रा.पं. सदस्य बालाजी माळी, विलास फुलसुंदर, मुख्याध्यापक एस.जे. चंदनशिवे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडित पवार, अशोक बेळे, जीवन गायकवाड, ज्ञानेश्वर भुजबळ, निर्धार समितीचे अध्यक्ष गोपाळ फुलसुंदर, सुभाष भुजबळ यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जाधव के एल यांनी केले तर आभार एस.व्ही.पेठकर यांनी मानले.