मुर्तीजापुर :- दिवसेंदिवस वाहनांची वाढत चाललेली गर्दी आणि त्यासोबतच वाढत असलेले अपघात आणि त्या अपघातात मृत्युमुखी पडणारी निरपराध माणसे आणि त्यांच्या मृत्यूने हेलावणारे सृजनशील मनाची समाजातील माणसं हा सर्व व्यथित करणारा प्रकार सतत सुरू आहे. रक्तदान करून लोकांचे प्राण वाचविण्याच्या ऐवजी नियमांचे उल्लंघन करून भरधाव वेगाने वाहतुकीच्या नियमांची ऐशीतैशी करत वाहने चालवून रस्त्यांना रक्ताचा अभिषेक घालून प्राणदान देण्याचे प्रकार थांबविण्यासाठी अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून व उपअधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्य आणि नाट्य यांच्या माध्यमातून "जमुरे" या नावाखाली जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रम करून प्रबोधन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
येथील भारतीय ज्ञानपीठ विद्यालयात मुर्तीजापुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांनी सदर नाट्य जनजागृती आणि पोलीस उदय दिवस(रेसिंग डे) निमित्त सुरू असलेल्या सप्ताह निमित्त आयोजित केला होता.नाटिकेमधे पोलिस विभागातील कर्मचारी कलाकाराची भूमिका करीत आहेत. यामध्ये निलेश घाडगे, संजय भगत, योगेश जवळकर, प्रशांत केदारे, पूजा पालीवाल, नम्रता लाड, भाग्यश्री मेसरे, श्रीकांत तळोकार, कार्तिक काळे, राहुल तायडे यांचा समावेश होता. त्यांनी रस्ता अपघात नियमांचे उल्लंघन आणि त्यातून होणारे अपघात, अपघातातून घडणारे मृत्यू आणि अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबावर येणारे संकट याचे जिवंत चित्रण उभे करून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले.
यावेळी विद्यार्थी आणि नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळा, गाडी चालविणे पूर्वी तपासणी करा, हेल्मेट वापरा, वेग नियंत्रणात ठेवा, मद्यपान करून गाडी चालवू नका याबाबतचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय ज्ञानपीठ चे प्राचार्य विकास सावरकर ,नायब तहसीलदार वैभव फरताडे, नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ ,भाऊसाहेब खांडेकर,विलास नसले यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाकरिता मुर्तीजापुर शहर पोलिस स्टेशनचे मनोहर मोहाडे, संतोष हंबर्डे, संजय लहाने, अनिल सर्वेश कांबे, शाम मोहाडे, मनिष मालठाणे, सतीश सपकाळ दीपक बुनगे चालक पद्माकर लंगोटे यांनी परिश्रम घेतले