मुर्तीजापुर :- समाजात वावरत असताना चिकित्सक दृष्टिकोन ठेवून होणाऱ्या घडामोडींकडे जागृतपणे लक्ष ठेवणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या मानसिकतेचा आणि झालेल्या आपल्या मनावरील शिकवणीचा गैरफायदा काही भोंदूगिरी करणारे ठकसेन घेतात हे रामरहीम आणि हनीप्रीत या गाजत असलेल्या प्रकरणावरून समाजापुढे आले आहे. संतांनी आपल्याला दिलेली शिकवण ही अनमोल असून होऊन गेलेल्या संतांनी कधीही चमत्कार केला नाही.
तर समाजाला जागृत करण्याचे कार्य केले. परंतु त्यांच्या नावाने चमत्कार चिपकविण्याचे प्रयत्न मात्र झालेले आहेत.जगात आपोआप काहीच घडत नाही. तंत्र-मंत्र भूत भानामती जादूटोणा चमत्कार,भविष्य हे सर्व थोतांड आहे. प्रत्येक चमत्कारा मागे वैज्ञानिक कारण असते. आणि चमत्कार करणारे हे बदमाश असतात ते आपले पोट भरत असतात. समाजात अंधश्रद्धा पसरविणाऱ्या पासून सावध राहावे आणि इतरांनाही सावध करावे असे प्रतिपादन विलास नसले यांनी केले .येथील श्री गाडगे महाराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे आयोजित विशेष शिबिरात "चमत्कारा मागील वैज्ञानिक दृष्टिकोन" या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी त्यांनी विविध प्रयोगाच्या माध्यमातून या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संतोष ठाकरे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डी.डी. शहाळे, प्राध्यापिका मनीषा यादव, प्राध्यापिका मीना भाकरे व श्याम काकडे,जिवन घोरमोडे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन श्वेता चक्रनारायण व अतुल इंगोले यांनी केले. आभार प्रिया देशमुख यांनी व्यक्त केले.