मुर्तिजापूर :- स्वामी विवेकानंद विचार मंच या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत संघटनेच्या वतीने विवेकानंद जयंती निमित्त आयोजित होणाऱ्या व्याख्यानमालेस शुक्रवार दि. ११ जानेवारी पासून सुरुवात होणार आहे .
गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून यानिमित्ताने विविध क्षेत्रातील नामवंत वक्त्यांना एकण्याची संधी शहर वासियांना मिळणार आहे . स्थानिक राधा मंगलम् तिडके नगर येथे व्याख्यानमालेचे पहिले पुष्प शुक्रवार ११ जानेवारी रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मुरलीधर चांदेकर हे " भारतीय शिक्षणाची समग्रता '' या विषेशकरून महाविद्यालयीन तरुणांसाठी असणाऱ्या विषयावर गुंफणार आहेत . शनिवार १२ जानेवारीला आंतरराष्ट्रीय पातळीवर लंडन व मलेशिया येथे गाजलेले आंबेडकरी चळवळीतील रमाबाई आंबेडकर यांच्या जीवन चरीत्रावर आधारित प्रभाकर दुपारे लिखीत व चंद्रसेन डोंगरे दिग्दर्शित एकपात्री नाट्यप्रयोग " रमाई " हा सौ. लता डोंगरे पुलगाव या सादर करणार आहेत . रविवार १३ जानेवारी सुप्रसिद्ध विचारवंत लेखक व वक्ते विवेक घळसासी नागपूर हे " मुकी होत चालली घरे " या विषयावर तिसरे व अंतिम पुष्प गुंफणार आहेत . दररोज सायंकाळी सात वाजता नियोजित वेळेवर कार्यक्रम सुरु होणार असल्याने श्रोत्यांनी वेळेपुर्वी कार्यक्रम स्थळी उपस्थित रहावे असे आवहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .