शकुंतलाचा रेल्वेचा डबा जळीतप्रकरणी संभ्रम कायम भुसावळ मंडळाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांंची मुर्तिजापूर येथे धाव


मुर्तीजापुर :-  इंग्रज कालीन ऐतिहासिक  नँरोगेज शकुंतला रेल्वे डब्याला दि.२२ चे  रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास अचानक आग लागण्याचा प्रकार उघडकीस आल्याने चांगलीच धावपळ उडाली. मुर्तीजापुर येथून नॅरोगेज शकुंतला रेल्वे ही मूर्तिजापुर ते अचलपूर दररोज एक फेरी करते. सकाळी७.०५ वाजता  निघालेली ही रेल्वे सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी परत आपल्या मुर्तीजापुर या गंतव्य ठिकाणी पोहोचते.

सदर गाडी दि.२२ रोजी देखील नेहमी प्रमाणे या ठिकाणी येऊन पोहोचली. चार डबे आणि एक इंजिन असा  गाडीचा पसारा असतो. सदर चारही डब्यांना येथील रेल्वे स्टेशनवर चार्जिंग केल्या जाते. ज्यामुळे गाडीतील लाईट आणि पंखे चालतात. नेहमीप्रमाणे या ठिकाणी दिनांक बावीस चे रात्री देखील गाडीचे बोगींना चार्जिंगसाठी लावण्यात आले होते.त्यामधील बोगी क्र.सी.आर.आय.158 या बोगीला अचानक आग लागण्याचा प्रकार रात्री साडेबाराच्या सुमारास उघडकीस आला.

त्यानंतर मूर्तिजापूर येथील सर्व स्टॉपला याबाबत माहिती मिळाल्यानंतर सर्वजण या ठिकाणी पोहोचले. पेटलेल्या डब्यालगत  इतरही आणखी तीन डबे जळून खाक होण्याचा धोका निर्माण झाला होता. परंतु येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सावधानता आणि प्रसंगावधान राखून एका बाजूचे दोन आणि एका बाजूच्या एक डबा याच्यापासून वेगळा करत दूर अंतरावर नेल्याने इतर तीन डबे आगीच्या तडाख्यातून वाचले. अन्यथा सर्व चारही बोगी जळून खाक झाल्या असत्या. सदर गाडी अचलपुर येथून परत आल्यानंतर डबे सोडून इंजिन लोको शेडमध्ये दुरुस्तीच्या आणि तपासणीकरिता जात असते. सुदैवाने इतर कुठलीही अप्रिय घटना घडली नाही.           
                       
डब्बा जळीतप्रकरणी भुसावळ मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मूर्तिजापूर येथे धाव घेतली आणि सदर डब्याचे निरीक्षण केले. परंतु यामध्ये ते कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचू शकले नाहीत अशी माहिती मिळाली. त्यामुळे डबा कशाने जळाला ? हा प्रश्न कायम आहे. भुसावळ येथून पाहणी करता आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये   विभागीय  सुरक्षा अधिकारी(डि.एस.ओ.)  श्री. अग्रवाल,  अतिरिक्त विभागीय सुरक्षा अधिकारी श्री. माही असिस्टंट इलेक्ट्रिक इंजिनिअर श्री. भगत त्याचप्रमाणे सीनियर  मेकॅनिकल इंजिनिअर तसेच त्यांचे सोबत मूर्तिजापूर येथील स्टेशन अधीक्षक ए.जे. नलावडे, जी.आर.पी.चे ठाणेदार प्रवीण वांगे, सी.अँँण्ड डब्ल्यू चे अभियंता अमोल जुमळे, आर,. पी. एफ. चे वाकोडे आणि जीआरपी मूर्तिजापूरचे जळमकर सोबत होते. सदर डबा जळीतप्रकरणी काय निष्कर्ष निघतो याकडे मुर्तीजापुर वासियांचे लक्ष लागून आहे.           
         
शकुंतला नँरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची मागणी कित्येक वर्षापासून सतत होत असतांना देखील अद्यापही त्याकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. याउलट इतर ठिकाणच्या नवीन रेल्वे लाईन मंजूर करून मुर्तीजापुर तसेच या रेल्वेला जुळलेले तीन जिल्हे आणि या तीन जिल्ह्यातील रहिवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम रेल्वे विभाग करीत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातआहेत. शकुंतला ही नॅरोगेज रेल्वे मूर्तिजापुर ते अचलपूर पर्यंत सुरू असून अत्यंत जीव मुठीत धरून हा प्रवास करावा लागतो. कारण या रस्त्यावरील सर्व पूलांचे आयुष्य संपत आलेले आहे. त्याच प्रमाणे रूळावर गिट्टी नाही, ट्रँक ची दुरुस्ती नाही. असे अनेक कारणांमुळे या गाडीला मुंगीच्या पावलाने चालत चालत अचलपूर आणि तेथून परत मुर्तीजापुर गाठावे लागते ही अत्यंत गंभीर बाब आहे. याकडे रेल्वेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि भारतीय रेल्वे विभाग लक्ष देईल काय ?असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post