इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- जिजाऊ ब्रिगेड लोहारा तालुका यांच्यावतीने जिजाऊ-सावित्री जन्मोत्सवानिमित्त
लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात जागर रणरागिणीचा, सन्मान स्त्री शक्तीचा प्रबोधनात्मक व्याख्यान व कर्तुत्ववान महिलांचा सन्मान सोहळा कार्यक्रम घेण्यात आला.
सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ - सावित्री यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती आश्विनीताई पाटील (लोहारा) होत्या तर प्रमुख म्हणून डॉ.संदीप तांबारे सर, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा अर्चनाताई अंबुरे, उपाध्यक्षा ताई बोराडे, संघटक वंदनाताई भगत, मसेसचे गोरे साहेब, भास्कर वैराळे सर, वि बी वी पी जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड, उप प्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी, अदि उपस्थित होते.
यावेळी "सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांचे स्थान" या विषयांवर मार्गर्शन करताना प्रमुख वक्ते डॉ. संदीप तांबारे म्हणाले की, स्त्रिया सक्षम व्हायच्या असतील तर त्यानी त्यांच्या मनातील न्युनगंड काढून टाकला पाहिजे. स्त्री ही मूळातच खूप ताकदवान, बुद्धिमान, सशक्त, सोशिक असते. निसर्गाने स्त्रीला खूप प्रबळ बनवले आहे. पुरुषांपेक्षा स्त्रीमध्ये गुणवत्ता नक्कीच जास्त आहे. परंतु संधीच्या अभावी ती उपेक्षित राहते. तरीही विषमतावादी वातावरणात स्त्री आपले स्थान बळकट करत आहे. ही समाधानाची बाब आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एखादी स्त्री खांबीरपणे उभी असते. हे आपण इतिहासावरुन पाहू शकतो. स्त्री तिच्या आयुष्यात अनेक भूमिका पार पाडत असते. कधी ती आई असते, कधी बायको, बहिण तर कधी मैत्रीण. परंतु या सर्व भूमिकामध्ये ती पुरुषांच्या मागे एक प्रेरणा बनून उभी असते. स्त्रिया प्रगतीच्या प्रवाहात मागे राहिल्या तर त्याचे अनिष्ठ परिणाम समाजावर दिसून येतील. स्त्रियाना समजून घेण्यात पुरुष कमी पडत आहेत. स्त्रीच्या भावना, विचार निर्मळ मनाने समजून घेतले पाहिजे. अशा व्यक्ती संख्येने फार कमी आहेत हीच शोकांतिका आहे. स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळावे, तिच्याबद्दल सर्वानी आदर बाळगावा अशी स्त्रीची अपेक्षा असते. यासाठी सर्व समाजाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच समतावादी, स्त्रीप्रधान संस्क्रुतीची वाढ होईल. जिजाऊ, सावित्री यांच्या चरित्रातुन प्रेरणा घेत आज अनेक महिला प्रगतीपथावर असुन त्यांची क्रांतिकारी वाटचाल सुरु आहे. जिजाऊ ब्रिगेड याच विद्रोही विरागंणांचा वारसा जपत महिलांचे प्रबोधन करीत आहे,असे सांगीतले.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अर्चनाताई अंबुरे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, प्राचीन काळापासून महिलाना दुय्यम दर्जा मिळाला आहे. समाजात नेहमी जात, धर्म आणि लिंग याआधारे भेदभाव केला जातो. लिंगाधारित भेदभावामूळे महिलांचे समाजातील स्थान खूपच रसातळाला गेले आहे. समाजात पावलोपावली स्त्रीची खूप उपेक्षा होत आहे. पुरुषांचा स्त्रीकडे पाहाण्याचा द्रुष्टीकोन निर्मळ नाही हे आपण अनुभवावरुन सांगू शकतो. पुरुषप्रधान संस्क्रुतीत स्त्रीची होणारी कुचंबना नवीन नाही. तरीही जिजाऊ सावित्रीमाईसह अनेक महिलांनी विषमतावादी परिस्थितीवर मात करुन उज्ज्वल इतिहास निर्माण केला आहे, असे सांंगीतले.
यावेळी कला, क्रिडा, वकील, पोलिस, डॉक्टर, राजकीय, सामाजिक, साहित्यिकसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या सर्व रणरागिणींचे जिजाऊ ब्रिगेड यांच्यावतीने पुष्पगुच्छ व पुस्तके भेट स्वरूपात देवुन अनोख्या प्रकारे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्षा शिवमती रंजनाताई हासुरे व सूत्रसंचालन मोहिनी मोरे यांनी केले तर संभाजी ब्रिगेड उमरगा तालुकाध्यक्ष मोहन जाधव यांनी आभार मानले. या कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे दीपक जाधव, प्रकाश भगत, श्रीधर इंगळे, दत्ता जाधव, श्रीकांत हासुरे, रवींद्र अंबुरे, व्हीबीव्हीपी च्या जयश्री सुरवसे, मोहीनी मोरे, निकिता कोळगे, महादेवी जाधव, अनुसया माळी, संभाजी ब्रिगेडचे संजयनाना जाधव, दादा पाटील, सहदेव गोरे, शैलेश चंदनशिवे, श्रीधर इंगळे, दत्ता जाधव, राम शिंदे, गोविंद सोबाजी, युवराज मडोळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.