इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- समाजात शेती व्यवसायाविषयीची अनास्था, नियोजनाचा अभाव, शासकीय धोरणे, शेत मालाला हमी भाव नसणे, वाढत्या शहरीकरणाच्या समस्या आणि वाढते प्रदुषण, पाण्याचा अपव्यय, निसर्गाचा लहरीपणा, लोडसेडींग, आळसीवृत्ती, मजूरांचा आणि श्रम प्रतिष्ठेचा अभाव, शेतीकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टीकोन व पारंपारिकता, वाढती महागाई अशा कितीतरी बाबींमुळे दिवसेंदिवस दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यावर मात करण्यासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने प्रयत्न केले पाहीजेत. दुष्काळावर कायमची मुक्तता करावयाची असेल तर त्यासाठी नियोजनबध्द व आधुनिक पध्दतीने शेती करावी लागेल. त्यामध्ये तरुणांचा मोठा सहभाग असला पाहिजे. सर्व प्रथम लोकांनी स्वतःची मानसिकता बदलून आणि सर्वांनी मिळून शेती व्यवसायाला मुल्य प्राप्त करुन देण्यासाठी सामुदायीक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे यांनी केले. लोहारा तालुक्यातील मोघा (बुद्रुक) येथील सार्वजनिक चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद व शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय, लोहारा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार(ता.२८)रोजी सायंकाळी जलव्यवस्थापन व जलसंवर्धन विशेष शिबीराप्रसंगी आयोजित 'दुष्काळ मुक्ती आणि युवकांचे योगदान' या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.एम.एल.सोमवंशी होते.
तर प्रमुख म्हणुन शरणाप्पा कोनाळे, पीप्युस ऑलपिंक असोसिएशन इंडियाचे सचिव महमदरफी शेख, उपप्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी, प्रा.व्यंकट चिकटे, दगडू माटे, सरपंच शिल्पा पाटील, उपसरपंच गणेश मते, ग्रामसेवक डी. पी.पवार, विनोद जावळे पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी सुर्यवंशी, प्रा.डॉ.एस.एस.कदम, आदीं, उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ.महेश मोटे म्हणाले की, शेती व्यवसायामध्ये तरुणांनी अधिक लक्ष घालून आधुनिक पध्दतीने शेती केली पाहीजे. तीला अधिक मुल्य व दर्जा प्राप्त करुन दयावयाचे असेल तर कठोर परिश्रम केले पाहिजे. त्यामध्ये तरुणांचा मोठा सहभाग असला पाहिजे, असे ते शेवटी सांगीतले. अध्यक्षीय समारोप डॉ.एम.एल.सोमवंशी यांनी केला. व सूत्रसंचालन व आभार प्रा.डी.एन. कोटरंगे यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.