- दूरसंचार विभागाचे केबल्स तसेच जलवाहिन्या आणि अतिक्रमणांंचा अडसर ठरतोय कामाला गतीरोध
- धनदांडग्यांंचे अतिक्रमण हटविण्यासाठी टाळाटाळ का?
मुर्तीजापुर :- येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वीर भगतसिंग चौकापर्यंतचे शहरातील ८० फुटी मुख्य रस्त्याचे कांक्रिटीकरण व सौंदर्यीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. सदर काम नागपूर येथील खळतकर कन्ट्रक्शन ला देण्यात आलेले आहे. जवळपास २७ ते २८ कोटी रुपयांचा रस्ता रुंदीकरणाचे आणि सौदर्यीकरणाचे काम काही दिवस संथ गतीने सुरू होते. सदर कामाला रस्त्यावरील अतिक्रमणे त्याचप्रमाणे रस्त्याच्या खाली दूरसंचार विभागाच्या कॅबल्स तसेच जलवाहिन्या, इंटरनेटचे कॅबल्स असल्या कारणाने कामाला अडथळे निर्माण होऊन व्यत्यय येतो. काम ज्या गतीने होणे अपेक्षित असते तसे होत नाही. याचा नाहक त्रास जनतेला होतो. परंतु आता या कामाला एका बाजूने गती आलेली आहे. तर दुसऱ्या बाजूचा रस्ता खोदतांना अशाच प्रकारे अडथळे निर्माण होत आहेत. यामध्ये अतिक्रमण व जमीनीखालील जलवाहिन्या, पाण्याचे पाईप, दूरसंचार विभाग , इंटरनेटच्य्या केबल्स आणि इतर कंपन्यांच्या केबल्स यामुळे जे काम मशीन ने एका दिवसात होते.
ते काम करण्यासाठी मजूर लावून आठ दिवस लागत आहेत. या सर्व बाबींचा विचार करता या विभागांनी आपापल्या केबल आणी जलवाहिन्यांचे काम पूर्वीच व्यवस्थित केली असती तर रस्ता निर्मितीला कुठलाही अडथळा आला नसता. रेल्वे गेट पासून तर भगतसिंग चौकापर्यंतचा रस्ता हा गतीने निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. दररोज जवळजवळ ७० ते ८० मिटर काम होत असल्याचे समजले. सिमेंट काँक्रेटचा हा रस्ता एकूण १८ मीटरचा असून दोन्ही बाजूने नऊ मीटरचा रस्ता निर्माण होत आहे .त्याचप्रमाणे १.२७५ मिटरचा दोन्ही बाजूंनी फुटपाथ तर १.५० मिटरची दोन्ही बाजूला नाली व ०.४५ मिटरचे दुभाजक (डिवायडर) राहणार आहे.रस्ता सौंदर्यीकरणाचे काम आणखी जलद गतीने झाले पाहिजे अशी मागणी जनतेतून होत असल्याने काम जलद करण्यावर भर दिला जात आहे.
मुख्य मार्गाचे काम आणि सौंदर्यीकरणाचे काम गतीने व वेळेत पूर्ण करण्यासाठी अतिक्रमण सोबतच ईतर अडथळे दूर करून देणे आवश्यक असताना मात्र याकडे दुर्लक्ष करून कोणाला फायदा पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत ? असा सरळ प्रश्न विचारला जात आहे. काम अडखळत संथगतीने झाले तरी चालेल पण धनदांडग्यांच्या अतिक्रमणाला हात न लावता त्यांंची मर्जी राखण्याची धडपडी मागील कारण काय आहे ? एका धनदांडग्याचे अतिक्रमणाला वाचवण्यासाठी थेट मंत्रालयापर्यत फिल्डिंग लावण्यात आली होती.पण ती हाणून पाडण्यात आल्याची चर्चा शहरात सुरू आहे.शहरातील शासकीय ९ एकर जागेवर प्लाट पाडून विल्हेवाट लावण्यात आल्याचे उदाहरण ताजे आहे. याबाबत कोणीही ब्र बोलायला तयार नाही. अनेकांनी हातपाय ओले करून घेतले आहेत.
मुख्य रस्त्याच्या कामाला वर्षे पूर्ण होत आहे. पण काम वेगाने पुर्ण होण्यासाठी अतिक्रमण काढून जागा मोकळ्या का करून देण्यात आल्या नाहीत ? असा प्रश्न नागरिकांमधे चर्चिला जात आहे. अधिका-यांचे वेट अँण्ड वाँच मागील कारण काय ? नागरिकांना त्रास होत असतांंना मुख्यालयी न राहता अप-डाऊन करणारे संबंधित विभागाचे अधिकारी कारवाई का करीत नाही ? खरे कारण काय आहे ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे .
मुख्य रस्त्याचे काम वेळेच्या आत पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहे.रस्ता निर्मितीला अडथळा निर्माण करणारे अतिक्रमणे काढण्यासाठी वरीष्ठ पातळीवरून पत्रव्यवहार सुरु आहे. आमदार हरीष पिंपळे
सदर काम जलद गतीने होण्यासाठी कंपनीने सर्व तयारी केली असून आता आणखी वेगाने व्हावे करीता प्रयत्न राहणार असल्याचे आणि येणारे अडथळ्यांमुळे गतिरोध निर्माण होत असल्याने विलंब होणे स्वाभाविक असल्याचे इंजिनीयर लुकमान खान यांनी सांगितले.
रस्ता निर्मिती करीता अडथळे असलेले काही जण न्यायालयात गेल्याने अडथळे काढण्यात उशीर होत आहे. सौ.मोनाली कमलाकर गावंडे. नगराध्यक्षा मुर्तिजापूर