यवतमाळ :- पवित्र कुराणावर आधारीत इस्लामची शिकवण ही मानवी मुल्यांची जोपासणा करणारी आहे. स्त्रियांना धार्मीक स्वातंत्र्य, वारसा हक्क यासह स्त्रियांचे संरक्षण,शिक्षण तथा राज्य कारभारात सहभाग आदीचे स्वातंत्र्य देखील बहाल करण्यात आले. असे प्रतिपादन साहित्यीक डॉ.इकराम काटेवाला अहमदनगर यांनी म.फुले, डॉ.आंबेडकर स्मृती पर्वात केले. देशाची सामाजिक व राजकीय परिस्थिती आणि आमची जबाबदारी या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. ते म्हणाले, धर्माच्या नावाने येथे काही शक्ती धृवीकरणाच्या नादात राष्ट्राची एकात्मता धोक्यात घालीत आहे. देशातील मुलभूत समस्यावरील लक्ष विचलीत करण्यासाठी वारंवार एकाच विषयावर राजकारण करण्यात येत आहे. मंदिराचा प्रश्नापेक्षा वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरींच्या आत्महत्या, पिण्याचे पाणी या गरजांकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.
मात्र सरकार भलत्याच गोष्टींना खतपाणी घालीत आहे. देशातकेवळ मुस्लिमच नव्हे तर सामान्य नागरीक देखील दडपणाखाली आहे त्याला भीतीदायक वातावरणातून मुक्ती पाहिजे आहे. याकरीता सर्व पुरोगामी विचारांच्या पुढारींनी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले. प्रास्तविक जमाते ए इस्लामी हिंदचे अध्यक्ष जियाउद्दीन यांनी केले. विचार पिठावर रियाज़ सिद्दीकी, अॅड.इम्रान देशमुख, रियास खान, मंसूर एजाज जोशी, मतिन तमन्ना, अकबर शाहिर, शेख महेबूब आलम, प्रा.सलीम चव्हाण, सिकंदर शहा, काझी अमिनोद्दीन, साजिद पटेल,फसिउल्ला खान, डॉ.खालीद अनवर, अॅड.निजामुद्दीन,कवडू नगराळे, ज्ञानेश्वर गोरे आदी उपस्थित होते. संचालन अताउर्रहमान रहमान तर आभार शहबुद्दीन यांनी मानले.