लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यात सलग तिन दिवस भुकंपाचे सौम्य धक्के बसल्याने ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.सतत बसणारे भूकंपाच्या धक्क्यामुळे लोहारा तालुक्यातील भूकंपप्रवण क्षेत्रातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण कायम आहे.
लोहारा तालुक्यातील अनेक गावांना 30 सप्टेंबर 1993 रोजी भूकंपाचा मोठा धक्का बसला. त्यात अनेक गावे जमिनदोस्त झाली. लोहारा तालुक्यातील सास्तूर, माकणी, तावशीगड, तोरंबा, होळी, राजेगाव, मुर्शदपूर, रेबेचिंचोली, हराळी, सालेगाव, उदतपूर, एकोंडी, कोंडजीगड, काटेचिंचोली, करजगाव तर उमरगा तालुक्यातील पेठसांगवी, नारंगवाडी, कवठा, बाबळसूर, नाईचाकूर, समुद्राळ, बोरी, मातोळा, औसा तालुक्यातील किल्लारी, गुबाळ, नांदुर्गा, मंगरूळ,लामजना, बाणेगाव, कवळी, हिप्परगा, मातोळा, या गावांना मोठा फटका बसला. त्यामुळे या परिसराला भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाते. अधून-मधून या परिसराला सतत कमी अधिक प्रमाणात भूकंपाचे धक्के बसत आहेत. गेल्या काही वर्षापासून भूकंपाची तीव्रताही अधिक जाणवायला लागली आहे.
भूकंपाच्या धक्क्यामुळे शासनाने बांधून दिलेल्या घरांना तडे गेले आहेत. सलग तीन दिवसापासून भकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. लोहारा तालुक्यात दि.14 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजून 55 मिनिटाला 2.2 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर दि.15 डिसेंबर रोजी सांयकाळी 6 वाजून 40 मनिटाला तर दि.16 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजून 26 मिनीटाला पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का बसला. परंतु लातूर येथील भकंपमापक यंत्रावर याची नोंद झालेली नाही. या भुकंपाचे केंद्रबिंदु औसा तालुक्यातील किल्लारी येथे आहे.
दि.14 डिसेंबर रोजी झालेल्या भुकंपाची 2.2 रिश्टर स्केलची नोंद आहे. दि.15 डिसेंबर व दि.16 डिसेंबर रोजी झालेल्या भुकंपाची नोंद झाली नाही. अशी माहीती प्रभारी अधिकारी अभिजित बोर्डेकर ( भुकंपमापक यंत्र विभाग लातुर ) यांनी दिली.