इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- भूम व उमरगा तालुक्यांना ट्रिंगर २ लागू करून उस्मानाबाद जिल्हा दुष्काळी घोषित करावा,अशी मागणी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसुल मंत्री चंद्रकांत (दादा)पाटील यांच्याकडे केली आहे.
सतत अवर्षणग्रस्त व दुष्काळी असलेला उस्मानाबाद जिल्हा याही वर्षी पर्जन्यमान अत्यल्प व पावसात खंड झाल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील भूम व उमरगा वगळता परंडा,वाशी, लोहारा,कळंब,उस्मानाबाद तुळजापूर तालुक्यांना ट्रिंगर 2 लागू केला आहे.भूम व उमरगा तालुक्यातही या वर्षी सरासरीपेक्षा अल्प पर्जन्यमान झालेल्या असून पावसामध्ये मोठ्या प्रमाणात खंड पडला आहे.
यामुळे या भागातील भूजल पातळी खूप खालावली आहे.तरी सन सप्टेंबर 2018 च्या हंगामातील करण्यात आलेल्या मूल्यांकनुसार ट्रीगर 2 केलेल्या राज्यातील तालुक्यांच्या यादीमध्ये भूम व उमरगा तालुक्याचा समावेश करून संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा दुष्काळी घोषित करण्यात यावा,अशी मागणी केली आहे.