यवतमाळ(प्रतिनिधी) : यवतमाळ नगर परिषदेत शिवसेना आणि भाजपा हे दोन पक्ष सत्तेत आहेत. परंतु या दोन पक्षांचे एकमेकांशी आपसात पटत नाही. त्यांच्यातील वादावादीचा दुष्परिणाम मात्र शहराचे आरोग्य स्वच्छता हिरावण्यात होत आहे. कमालीची स्वच्छता शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढिग, घाण, सांडपाणी व ठिकठिकाणी खोदून ठेवलेले खड्डे, मोकाट जनावरे विशेषत: डुकरे व नाल्या चोकब झाल्याने वरतुन वाहनारे घाण सांडपाणी यामुळे शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे तर यवतमाळकर हे डेंग्युच्या विळख्यात सापडले आहेत. तातडीने प्रशासनाने शहर स्वच्छ करुन रोगजंतूचा होणारा प्रादुर्भाव बंद करावा अन्यथा साथीच्या रोगाने शहरातील नागरीक दगावला तर त्याचा मृतदेह मुख्याधिकारी यांच्या कक्षात मी स्वत: नेवून टाकेन असे उद्गार वारकरी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिकंदर शहा यांनी आज एका पत्रकार परिषदेत बोलतांना काढले.
नगराध्यक्षा शिवसेनेच्या आहेत तर भाजपची सदस्य संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नगराध्यक्षांचा कुठलाही वचक प्रशासनावर राहिला नाही. आपसातील भांडणाचा परिणाम शहराच्या स्वच्छतेवर होत आहे. प्रत्येक नगरसेवकाला त्याच्या प्रभागासाठी स्वच्छता करण्यासाठी पुरेसे कर्मचारी देण्यात येत नाही. प्रभाग क्र.8,9 व 10 आणि प्रभाग क्र. 18 या भागात नाल्या अनेक दिवसांपासून स्वच्छ करण्यात आल्या नाही. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचून आहेत. डुकरे या घाणीत लोळतात तर वेगवेगळ्या विकास कामांसाठी खोदण्यात आलेले रस्ते अजुनही तसेच ठेवले आहेत.
त्यामुळे जेष्ठ नागरीक व शाळकरी विद्यार्थी यांना वाहन चालविणे यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यवतमाळ शहरातील जुने शहर आणि नव्याने नगर परिषदेत समाविष्ट झालेला ग्रामिण परिसर या सर्व भागातच स्वच्छतेचा प्रश्न कायम आहे. या अत्यंत गंभीर प्रश्नाची त्वरीत दखल घेवून संपूर्ण शहर स्वच्छ व्हावे तसेच मोकाट जनावरे व शहरातील डूकरांचा बंदोबस्त करावा, फॅागींग मशिन नियमितपणे शहरात फिरावी. त्याचप्रमाणे रोगजंतू नष्ट करणारी औषधी फवारण्यात यावी. जेणेकरुन या साथरोगांच्या जंतूचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात येईल.
आजच्या घटनेत यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात तब्बल 263 रुग्ण डेंगुचे पॉझीटव असून खाजगी रुग्णालयात त्यापेक्षा कितीतरी पटीने रुग्ण दाखल आहेत. या सर्व बाबीला नगराध्यक्ष, सत्तेतील नगरसेवक आणि मुख्याधिकारी हेच जवाबदार आहेत. प्रशासनाने निष्क्रीयता सोडून सक्रीय होवून हा अत्यंत जिव्हाळ्याचा स्वच्छतेचा विषय सोडवावा अशी मागणी कॉंग्रेसप्रणीत वारकरी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिंगदर शाह यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना केली. यावेळी पत्रकार परिषदेला शब्बीर खान, अरुण ठाकुर, प्रदिप डंभारे, धनंजय वानखडे, अन्सार अली शाह आदी उपस्थित होते.