बनावट कीटकनाशक विक्रीचे ही संघटित गुन्हेगारीच .


यवतमाळ : कळंबमधील गुरुदेव जिनिंग, गुरुदेव कृषी केंद्र व जीजे ॲग्रो केमिकल्सच्या माध्यमातून बनावट कीटकनाशक विक्रीचे कळंब कनेक्शन राज्यभर पोहोचल्याचा आरोप जिल्हा शेतकरी संघर्ष समितीने केला आहे. गतवर्षीच्या हंगामात कीटकनाशकांच्या फवारणीतून बळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूलाही थोटे बंधूसारखेच घटक कारणीभूत असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून उच्चस्तरीय चौकशीची मागणीही समितीने केली आहे. 

स्थानिक विश्राम भवनात आयोजित पत्रकार परिषदेला समितीचे प्रवीण देशमुख, अशोक बोबडे, अनिल हमदापुरे, प्रा. घनश्याम दरणे, दिनेश गोगरकर, सुरेश चिंचोळकर, अनिल गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी देशमुख म्हणाले की, बनावट बी-बियाणे, खते व कीटकनाशकांच्या व्यावसायिक विक्रीच्या अंगाने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे शोषण चालले आहे. कळंबमधील गोदामातून सव्वा कोटीच्या घरात बनावट कीटकनाशकांचा साठा जप्त करण्यात आला.


 त्यामध्ये आरोपी सचिन कावळे, थोटे बंधूंच्या राजकीय लागेबांध्यामुळे कृषी व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी आजवर कारवाईकडे दुर्लक्ष केले. केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता नसताना खुलेआम कीटकनाशकाची निर्मितीच कळंबमध्ये होत असेल तर ही संघटित गुन्हेगारी असल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीने केला. या गंभीर प्रकाराची निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणीही समितीने केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांना तसे निवेदनही सादर केले आहे..

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post