बनावट रबर स्टॅम्प व कागदपत्रे तयार करुन शासनाची फसवणुक: सोनवाढोणा येथे दोघांना अटक


यवतमाळ(प्रतिनिधी) :  बनावट रबरी स्टॅम्प व बनावट कागदपत्रे बनवून त्याचा वापर वेगवेळ्या शासकीय योजनांसाठी करुन शासनाची फसवणुक केल्या प्रकरणी अमरावती मार्गावरील सोनवाढोणा या गावातील दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरज बोंडे व उपनिरिक्षक मंगेश भोयर यांना त्यांच्या गोपनिय माहितीदाराकडून मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार सोनवाढोणा येथील दत्ता आनंदराव तडसे व किसन भिमराव सातपुते हे त्यांच्या  राहत्या घरी बनावट शासकीय कागदपत्रे तयार करण्यासाठी विविध शासकीय कार्यालयाचे बनावट रबरी शिक्के बाळगून असल्याची माहिती मिळाली.

या माहितीवरुन खाजगी वाहनाने हे पथक सोनवाढोणा येथे पोहचले. तेथे त्यांनी दत्ता आनंदराव तडसे (40) याच्या राहत्या घराची पंचासमक्ष घरझडती घेतली. या झडतीत त्याचे घरातून सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया शाखा उत्तरवाढोणा, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, सचिव मालखेड, विशेष कार्यकारी अधिकारी, सचिव ग्रा.पं. सोनवाढोणा, शासकीय कार्यालयाच्या एकुण 17 बनावट रबरी स्टॅम्प मिळून आले. कोरे घरटॅक्स वसुली पावती बुक, कोरे जन्म प्रमाणपत्र, बनावट सातबारा उतारे, बनावट गाव नमुदा आठ अ, कोरे फेरफार पत्र, कोरे मृत्यू प्रमाणपत्र दाखले, कोरे नो ड्युज सर्टीफिकेट अशी विविध बनावट कागदपत्रे मिळून आली. त्याच्याकडे अधिक विचारपुस केली असता आरोपीने सदर शिक्के व कागदपत्राचा वापर करुन सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया कडून अनेकांना कर्ज मिळवून दिले. तसेच यवतमाळ, दारव्हा, नेर, वर्धा येथील न्यायालयातून बऱ्याच गुन्हेगाराच्या जमानती घेतल्या असे पंचासमक्ष कबुल केले.

त्याच  गावातील किसन भिमराव सातपुते याच्याही घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता यवतमाळ, तलाठी, ग्रा.पं. कार्यालय बारडतांडा, प्रकल्प अधिकारी एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा, महा ई सेवा केंद्र यवतमाळ, विस्तार अधिकारी तसेच सचिव ग्रा.पं. अर्जुनी, टाकळी, घुबडी, चिखलदरा, हिवरा, उमरी पोड, कुर्ला, भोसा, शिबला, डोर्ली, कार्यकारी अभियंता यवतमाळ पांटबंधारे विभाग यवतमाळ, उपविभागीय अधिकारी वाई, प्रकल्प पांढरकवडा अशा विविध शासकीय कार्यालयातील चाळीस बनावटी रबरी शिक्के मिळून आले. बनावट सातबारा, कोरे सातबारा, गावनमुना, उपसा सिंचना पाणी प्रमाणपत्र, दारीद्र रेषेखालील कुटूंबाचे प्रमाणपत्र आदी बनावट कागदपत्रे मिळून आले. किसन सातपुते याने या कागदपत्रंाचा व बनावट शिक्क्यांचा वापर करुन प्रकल्प अधिकारी पांढरकवडा, आदिवासी विकास महामंडळ यवतमाळ येथून अनेक लोकांच्या नावे रबरी पाईप व ऑईल इंजीनचा बेकायदेशिरपणे लाभ घेतला. अनेकांना बनावट दारिद्रय रेषेखालील कुटूंबाचे प्रमाणपत्र व पाणी परवाने बनवून दिल्याचे कबुल केले. गुन्हे पथकाने विविध शासकीय कार्यालयाकडून रबरी शिक्के व कादगपत्राची खात्री केली असताा ते बनावट असल्याचे सिद्ध झाले. पथकाने आरोपी दत्ता तडसे व किसन सातपुते यांना अटक करुन लाडखेड पोलीसांच्या ताब्यात दिले. अधिक तपास पोलीस करीत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post