![]() |
शेतकऱ्यांचा विमा दत्तक घेण्यासाठी मुर्तिजापुरचे उपविभागीय अधिकारी भगवान सैंदाने आणि तहसिलदार राहूल तायडे यांच्यासह त्यांच्या अधिनस्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि स्वस्त धान्य दुकानदार यांनी मिळून रु. 1 लाख 81 हजार 20 एवढी रक्कम जमा केली.
बुधवारी तहसिलदार राहूल तायडे यांनी सदर रकमेचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडलेल्या छोटेखानी या कार्यक्रमासाठी उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते, जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दौड व अन्य कर्मचारी यावेळी हजर होते. याशिवाय मूर्तिजापूर येथील कृषी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी यांनी रु. 23 हजार 200, बार्शिटाकळीचे तहसिलदार रवी काळे यांनी रु. 23 हजार 200, मारोती स्टोन क्रेशर यांनी रु. 11 हजार 200 रुपयांचा धनादेश दिला.
दरम्यान, शेतकरी, गरीब, वंचितांचा विमा व एफडीसाठी प्रशासन प्रत्येकाच्या नावे रु. 232 गुंतवणार आहे.
ही रक्कम वर्षानुवर्षे शेतकऱ्यांच्या नावे राहील. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून एवढी रक्कम भरण्यासाठी सामाजिक संघटना, प्रतिष्ठित नागरिकांनी शेतकऱ्यांना दत्तक घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले आहे.
ज्यांना आर्थिक योगदान दयावयाचे आहे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे किंवा दूरध्वनी क्रमांक 0724-2424444 वर संपर्क करावा अथवा ‘जिल्हाधिकारी, अकोला (प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना)’ या नावाने धनादेश किंवा बँकेचे नाव – आयडीबीआय, ‘बँक खाते क्र.0511104000123358, (IFSC कोड – IBKL0000511)’ वर दानराशी जमा करु शकतात, असे जिल्हाधिकारी यांनी कळवले आहे.
