![]() |
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी घेतला , जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा |
अकोला दि. 22- पाणद शेत रस्ते मोकळे करणे व शेतरस्ते तयार करणे हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले. शेतक-यांना समुपदेश करून शेतरस्त्यावरील अतिक्रमण काढून पाणद शेतरस्ते मोकळे करा असे निर्देश त्यांनी दिले. ज्या शेतरस्त्यांमध्ये कोणत्याही अडचणी नाहीत असे रस्ते लवकरात लवकर तयार करावे अशा सुचना पालकमंत्री यांनी दिल्यात.जनता दरबारापुर्वी खात्याचा आढावा घेण्यासाठी आज 22 जानेवारी रोजी पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी जिल्हा परिषदेला भेट दिली. व कामकाजाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शाहू महाराज सभागृह येथे आयोजीत जिल्हा परिषदेच्या अधिका-यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामुर्ती, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री पुढे म्हणाले की, जिल्हयात एकुण 926 जिल्हापरिषदेच्या शाळा आहेत त्यापैकी 5 शाळा इमारत विरहीत आहेत. जिल्हयात 144 शाळा किंवा खोल्या शिकस्त असून त्यामध्ये शाळा भरत नाहीत या जिर्ण अवस्थेतील शाळा पाडाव्यात अशा सूचना पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी यावेळी दिले. तसेच महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा शासननिर्णयाप्रमाणे महानगरपालिकाला हस्तांतरीत करण्यासाठी त्वरीत कार्यवाही करावी अशा सुचना शिक्षणाधिकारी यांना दिल्यात.जिल्हयात एकुण 1 हजार 44 पाणद शेतरस्ते असून त्यापैकी 82 रस्ते पुर्ण झाले असल्याची माहिती पंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री. कुळकर्णी यांनी दिली. उर्वरीत रस्ते लवकरच पुर्ण करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अकोट व पातुर तालुका हागणदारी मुक्त झाला असून अकोला , मुर्तिजापूर व बार्शिटाकळी तालुका 8 फेब्रुवारी पर्यंत तर तेल्हारा व बाळापूर तालुका 25 फेब्रवारी पर्यंत 2011-12 च्या उदिष्टाप्रमाणे हागणदारी मुक्त होणार आहे. स्वच्छ भारत मिशन मध्ये अकोल्याचा देशात 17 वा क्रमांक व राज्यात 6 वा क्रमांक असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.यावेळी जलयुक्त शिवार अभीयाना ,व्यक्तीगत शौचालय, प्रधानमंत्री आवास योजना, पाणद शेतरस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोल्हापुरी बांध आदिंचा आढावा यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.