लोकप्रतिनिधी, विदयार्थी, वयोवृध्द नागरिकांनी केली मोर्णाची स्वच्छता
विविध सामजिक, शैक्षणिक संस्थांचा सहभाग
अत्यंत शांततेत व शिस्तीत पार पाडली मोहिम
विविध संघटनांनी स्वच्छतेसाठी दिली विनामुल्य वाहने, जेसीबी,
दर शनिवारी केली जाणार मोर्णाची स्वच्छता
अकोला, दि. 20 – अकोला शहराचे वैभव असणाऱ्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज पुन्हा हजारो लोकांनी मोर्णाची स्वच्छता केली. आज सकाळी ठिक 8.00 वाजता मोर्णाच्या स्वच्छतेला प्रारंभ झाला. अनिकटच्या बाजुला लक्झरी बसस्टॉप जवळ (पूर्व भाग) आणि त्याच भागात दुसऱ्या बाजुला स्मशानभूमीच्या भागाकडून (पश्चिम भाग), या दोन्ही बाजुला स्वच्छतेचे काम करण्यात आले. जेसीबीव्दारे काढण्यात आलेला कचरा व जलकुंभी लोकांनी वाहनांमध्ये भरुन दिला. मोहिमेत महापौर विजय अग्रवाल, आमदार हरिश पिंपळे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दिलीप पाटील, उपजिल्हाधिकारी राजेश खवले, नगरसेवक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मीर, तहसिलदार सर्वश्री राजेश्वर हांडे, विश्वनाथ घुगे, राहूल तायडे, रवी काळे, संतोष येवलीकर, रेड क्रोस सोसायटीचे प्रजक्तसिंग बच्छर, शिवाजी महाविदयालयाचे प्राचार्य प्रा. भडांगे, यांच्यासह पोलीस कर्मचारी, विविध सामाजिक संस्था, बचत गट तसेच शिवाजी महाविदयालय, एस.ए. महाविदयालय, निरंकारी सेवा मंडळ, विक्रम गावंडे व मित्र मंडळ, नेहरु युवा केंद्र, सत्यसाई सेवा समितीच्या नागरिकांचा आणि मूर्तिजापूर येथील गाडगे बाबा स्वच्छता मंडळ स्वच्छता अभियान पथक, मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.नदीच्या ठिकाणी सर्वांच्या सुरक्षेबरोबरच स्वच्छते अंतर्गत करावयाच्या बाबींचे परिपूर्ण नियोजन जिल्हा प्रशासन आणि मनपा व पोलीस प्रशासनाने केले होते.
त्यामुळे सहभागी सर्वांनीच कुठलीही भीती न बाळगता स्वयंस्फुर्तीने नदी काठावरील कचरा हिरीरीने ट्रॅक्टर व घंटागाडीत टाकला. मोर्णा स्वच्छ झालीच पाहिजे या भावनेतून सर्वजण मन लावून काम करताना दिसत होते. विशेष म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार किंवा दुर्घटना न घडता ही मोहिम खूपच शिस्तबध्दपणे व शांततेने पार पडली. नदीतील जलकुंभी काढण्यासाठी अनुभवी कामगार व जेसीबीची मदत घेण्यात आली. काठावरील जलकुंभी ही सहभागी नागरिकांच्या मार्फत ट्रॅक्टर व घंटागाडीत भरण्यात आली. मोहिमेकरीता आवश्यक असणारी साधने व साहित्य मनपाकडून पुरविण्यात आले. यावेळी सर्पमित्र पथक, वैदयकीय सहायता पथक, पाणी व्यवस्थापन, साहित्य पुरवठा, जलकुंभी वाहतूक व्यवस्थापन ,नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथक नदीकाठी हजर होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, मोर्णाच्या स्वच्छतेसाठी लोकांनी आज दिलेला प्रतिसादही कौतुकास्पद होता. नदी पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत स्वच्छतेची ही मोहिम सुरुच राहणार आहे. यापुढेही दर शनिवारी लोकसहभागातून नदी स्वच्छ केली जाईल. जोपर्यंत नदी स्वच्छ होत नाही, तोपर्यंत स्वच्छता मोहिम सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.मोहिमेत कामगार, कर्मचाऱ्यांच्या संघटना, वाहतूक संघटना, पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी, विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना, महसूल/तलाठी कर्मचारी संघटना आदींसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत नागरिक, वयोवृध्द नागरिक, विदयार्थी आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते. केवळ अकोला शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातून अनेकजण स्वच्छतेसाठी पुढे आले होते.