‘टॅटू’मुळे अपात्र ठरलेल्या 'इच्छुक' जवानाला दिलासा


 मुंबई :- उजव्या दंडावर ‘आई’ शब्दाचा टॅटू कोरल्याने केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) भरतीप्रक्रियेतून बाद ठरवण्यात आलेल्या इच्छुक जवानाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्याला मुलाखतीच्या प्रक्रियेत सहभागी होऊ देण्याचे निर्देश देऊन न्यायालयाने यासंदर्भात केंद्र सरकारला आज, ४ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत असलेल्या सुरक्षा दलांपैकी एक असलेल्या ‘सीएपीएफ’तर्फे ‘असिस्टंड कमांडंट’ पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू आहे. त्यात रवीकुमार कराड या उमेदवाराने सहभाग घेऊन लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी उत्तीर्ण केली. मात्र, ६ मार्चला वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला साडेसहा किलो वजन अधिक असल्याने आणि उजव्या हातावर ‘टॅटू’ असल्याने अपात्र घोषित करण्यात आले. त्यानंतर त्याने वजन घटवून ते प्रमाणात आणले आणि ‘टॅटू’ काढण्यासाठी ‘प्लास्टिक सर्जन’कडे ‘लेझर’ उपचार सुरू केले. त्याआधारे त्याने वै‌द्यकीय फेरतपासणीची विनंती केली. त्यानुसार केंद्र सरकारच्या ‘मेडिकल बोर्ड’ने १४ मे रोजी त्याची पुन्हा वैद्यकीय तपासणी केली. मात्र, ‘उजव्या दंडावर दोन सें.मी. आकाराचे टॅटू आहे’, असे कारण देत त्याला पुन्हा अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे त्याने अॅड. एस. पी. कदम यांच्यामार्फत उच्च न्यायालयात रिट याचिका केली. याविषयी न्या. रणजित मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने प्राथमिक सुनावणीअंती हा अंतरिम आदेश दिला.

‘टॅटूमुळे कर्तव्य बजावण्यात अडथळा येत नसल्याने पात्रतेच्या अन्य निकषांची पूर्तता करणाऱ्या एका उमेदवाराबाबत अपवाद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने पूर्वी दिले होते. शिवाय या प्रकरणात याचिकादाराच्या उजव्या दंडावर टॅटू असल्याने सलामी ठोकताना तो दिसण्याची शक्यता नाही. शिवाय गणवेशाच्या बाह्यातही तो सहज झाकून जाऊ शकतो. इतकेच नव्हे तर लेझर उपचारांनी टॅटू ९० टक्क्यांपर्यंत काढण्याचे त्याचे प्रयत्नही सुरू आहेत. त्यामुळे नियमभंग कसा होतो?’, असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला. तेव्हा, यासंदर्भात प्रतिज्ञापत्रावर म्हणणे मांडू देण्याची विनंती केंद्र सरकारच्या वकिलांनी केली. त्यामुळे खंडपीठाने कराड यांना अंतरिम दिलासा दिला.

काय आहेत टॅटूबद्दलचे नियम ?

आपला देश धर्मनिरपेक्ष असल्याने देशवासूयांच्या भावनांचा आदर करायला हवा. त्यादृष्टीने भारतीय लष्कराप्रमाणे धार्मिक प्रतिके किंवा प्रतिमा किंवा नाम अशा टॅटूंना परवानगी असेल. हे टॅटू हाताच्या आतील बाजूस असायला हवेत आणि केवळ डाव्या हातावर असायला हवेत. कारण सलामीसाठी तो हात वापरला जात नाही. जेणेकरून सलामी ठोकताना टॅटू दिसणार नाही. तसेच टॅटूचा आकार शरीराच्या त्या विशिष्ट भागाच्या (कोपर किंवा हात) एक चतुर्थांश इतकाच असायला हवा.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post