मुर्तीजापुर :- येथील श्री. व्यंकटनाथ महाराज शिक्षण संस्थेद्वारा दरवर्षी दिल्या जाणाऱ्या कार्यगौरव पुरस्काराची निवड यावर्षी देखील करण्यात आलेली आहे. सदर संस्थेचा चौदावा कार्यगौरव पुरस्कारासाठी उद्योजक अशोक लक्ष्मणराव बावनेरकर डोंबिवली(पूर्व) जिल्हा ठाणे, मुंबई यांची निवड करण्यात आली असून ६ जानेवारी २०१९ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप अकरा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ या स्वरूपात असून अशोक बावनेरकर यांना हा पुरस्कार ६ जानेवारीला प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली. या पुरस्काराचे वेगळेपण म्हणजे पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले जात नाहीत. तर समाजाच्या विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करून वेगळ्या कार्याचा व समर्पणाचा अमीट ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते. याबाबत तज्ञ व जाणकारांशी चर्चा करून समाजकार्यातील योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो असे प्राध्यापक ढेरे यांनी सांगितले. आतापर्यंत हा पुरस्कार नटश्रेष्ठ निळू फुले, गजलनवाज भीमराव पांचाळे, नाट्यकर्मी रमेश थोरात, वरोरा येथील समाजसेवक प्राध्यापक उपलेंचवार, अमरावतीचे समाजसेवक गोविंद कासट, भायखळा मुंबई चे समाजसेवक एकनाथ ठाकूर, डॉ.आर.जी.राठोड, स्त्रीरोगतज्ञ डॉ. शराजेंद्र मंडलापुरे, उपजिल्हाधिकारी सचिन कलंत्रे संत गाडगे महाराज मिशन धर्मशाळा दादर ट्रस्टचे संचालक प्रशांत देशमुख इत्यादी मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
व्यंकटनाथ महाराज शिक्षण संस्थेचा पालक दिन सोहळ्याचे आयोजन दिनांक ६ जानेवारी रोजी करण्यात आलेले आहे. या प्रसंगी कार्य गौरव पुरस्काराचे वितरण, मान्यवरांचा सत्कार, ज्येष्ठ नागरिक सत्कार आणि शाळेत शिकलेल्या व वैद्यकीय क्षेत्रात एम बी बी एस साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रम असा दोन दिवसीय पालक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या पालक दिन सोहळ्याचे उद्घाटन दि.६ रोजी माजी संचालक महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी प्राचार्य श्री.सु.एनकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार राहुल तायडे यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच प्रथम माजी मुख्याध्यापिका व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूल सौ.संध्या तिवरकर, एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आशिष शिंदे, २००६ मध्ये शाळेच्या पायाभरणी करता विनामूल्य सेवा देणारे प्रकाशराव गावंडे, बीडीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन मुर्तिजापूर करांच्या सेवेत कार्यरत झालेल्या कु.समीक्षा दीपक भालेराव यांचा सत्कार यावेळी ठेवण्यात आलेला आहे. तर भाऊसाहेब खांडेकर, रामदास बोंडे, पंढरीनाथ गोडे, सुधाकर बोर्डे, बाळासाहेब काशीराम गावंडे, गंगाधर उंबरकर, श्रीकृष्ण नवले, महादेवराव पवार, एकनाथ इंगळे, ओमप्रकाश रामकर या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार देखील यावेळी करण्यात येणार आहे. तर प्रणव गावंडे व मंथन गावंडे या एमबीबीएस यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सदर पालक दिन सोहळा यशस्वितेकरिता उपाध्यक्षा प्राचार्या सौ. कुमुद दुबे, प्रा.राजेंद्र ताटे, सौ. राजश्री गोळे, प्रा.अवधूत ढेरे, प्राचार्या सौ सारिका कडू आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद परिश्रम घेत आहेत
