इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन या दिवसाचे औचित्य साधुन सह्याद्रि फाऊंडेशन्स उस्मानाबाद यांच्यावतीने बेंबळी येथील जिजामाता कन्या प्रशाला व छत्रपती संभाजी राजे कनिष्ठ महाविद्यालयात मुलींना नकोसा स्पर्श या विषयी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार घालून करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शिका म्हणुन प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ व सह्याद्री फाऊंडेशन्सच्या संस्थापक-सचिव डॉ. वसुधा दिग्गज दापके-देशमुख तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती आर.बी. गोडबोले होत्या तर प्रमुख म्हणुन सह्याद्री फाऊंडेशन्सचे उपाध्यक्ष डॉ. ईलियास खान, कार्याध्यक्ष गजानन पाटील, सामाजिक कार्यकर्ते मजहर पठाण, अदि उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ व सह्याद्री फाऊंडेशन्सच्या संस्थापक-सचिव डॉ. वसुधा दिग्गज दापके-देशमुख म्हणाल्या कि, लहान मुलांचे शोषण ही सगळ्यात दुर्दैवी घटना आहे, यातून लहान त्यांचे कोमल मन हेलावून जाते, त्यांच्या सोबत घडणाऱ्या या गोष्टी वडीलधाऱ्यांना कशा सांगाव्यात या हे देखील त्यांना कळत नाही, याचे विपरीत परिणाम त्यांच्या मानसिक व भावनिक आरोग्यावर होत असतात असे सांगुन मोठ्यांकडुन त्यांच्या शरीरावर होणारा स्पर्श चांगला की वाईट यातील फरक उपस्थित मुलींना समजावून सांगितला. यावेळी मुलींनी भाषणाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांच्या विषयी सविस्तर माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती शाहेदा शेख यांनी केले तर आभार श्रीमती आशा घोडके यांनी मानले. या कार्यक्रमास शिक्षक,विद्यार्थी,महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
