लोहारा शहरासह तालुक्यातील बहुतांश भागात गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस झालेल्या अवेळी पावसामुळे रब्बी पिकांना जिवदान मिळाले आहे


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरासह तालुक्यातील बहुतांश भागात गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस झालेल्या अवेळी पावसामुळे रब्बी पिकांना जिवदान मिळाले आहे. दुष्काळजन्य स्थितीतही धाडसाने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आतापर्यंत तालुक्यात रब्बीची 87 टक्के पेरणी झाली आहे.
          यंदा तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला. रब्बीच्याही आशा मावळल्याने दुष्काळाचे ढग गडद झाले आहे. यामुळे शेतकरी कमालीचा धास्तावला आहे. गेल्या दोन अडीच महिन्यापासून पाऊसच झाला नाही. तरीही तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज ना उद्या पाऊस पडेल, या आशेने रब्बीची पेरणी केली आहे. एका पावसावर येणाऱ्या ज्वारी, हरभऱ्याचा अधिक पेरा शेतकऱ्यांनी केला आहे. ज्वारी आलीच नाही तर किमान जनावरांसाठी कडबा तर होईल या अपेक्षेने पेरणी केली. मात्र पाऊस काही झाला नाही. अल्पशा ओलीवर उगवन झालेली पिके पाण्याअभावी कोमेजू लागली होती. ज्यांच्याकडे सिंचनाच्या सुविद्या आहेत अशांनी पिके जगविण्यासाठी केवीलवाणी धडपड सुरू केली. मात्र मागील पाच दिवसापासून अचानक वातावरणात बदल होऊन सोमवार, मंगळवार असा सलग दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. शहरासह तालुक्यातील नागूर, कानेगाव, भातागळी, मार्डी, बेंडकाळ, हिप्परगा, वडगाव, वाडीवडगाव, मोघा, धानुरी, माकणी, या परिसरात चांगला पाऊस झाला. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे कोमेजलेल्या ज्वारी हरभरा, करडई, ऊस या पिकांना चांगलचा फायदा झाला असून कोमेजलेल्या पिकांना जिवदान मिळाल्याने शेतकऱ्या आशा उंचावल्या आहेत.
 आतापर्यंत लोहारा तालुक्यात रब्बीची 87 टक्के पेरणी झाली आहे.  एकूण सरासरी 25 हजार 142 हेक्टर क्षेत्र रब्बी हंगामाचे आहे. यापैकी 21 हजार 856 हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. यात ज्वारी 5 हजार 50 हेक्टर, हरभरा 5 हजार 78, करडई 1 हजार 40  हेक्टरचा पेरा झाला आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post