अकोला :- अकोल्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी शेगावचे श्री गजानन महाराजांच्या भाविकांसाठी आठवड्यातून एकदा मुंबई येथून शेगावकरीता स्पेशल ट्रेन सुरू करण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे लेखी पत्राव्दारे केली.
शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांची समाधी आहे. तसेच याठिकाणी आनंद सागर हे उत्कृष्ठ असे उद्यान आहे. शेगावकरीता मुंबईसह देशातील विविध ठिकाणावरून श्री गजानन महाराज समाधी दर्शन व आनंद सागर येथे उदयानाला भेट देण्यासाठी असतात.
याकरीता दरवर्षी लाखो लोक संपुर्ण महाराष्ट्रातुन तसेच भारतातुन भेट देत असतात. या भाविक भक्तांना सोईचे व्हावे यासाठी मुंबई येथून शेगांवपर्यंत विशेष रेल्वे गाडी सुरु करावी, अशी या भागातील जनतेची मागणी आहे. या मागणीचा विचार करुन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केंद्रिय रेल्वे मंत्री यांच्याकडे मुंबई - शेगांव अशी रेल्वे सुरू करावी अशी मागणी केली आहे.
शेगांव रेल्वे स्टेशन जंक्शन नसल्यामुळे इंजिन बदलविण्यासाठी अकोला जंक्शनचा उपयोग होईल म्हणुन ती गाडी मुंबई ते अकोला अशी करण्यात यावी व या रेल्वेगाडीला श्री गजानन महाराज एक्सप्रेस असे नाव देण्यात यावे, असेही रेल्वे मंत्री यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.