- स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कामगीरी
यवतमाळ(प्रतिनिधी) : अकरा तारखेला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक संतोष मनवर यांनी आर्णी येथे कुख्यात अंतरराज्यतीय मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीतील सुत्रधारासह तिघांना अटक केली होती.
या तीनही आरोपींचा पोलीस कस्टडी रिमांड घेवून त्यांच्याकडे अधिक कसुन चौकशी केली असता सुत्रधार आरोपी शामराव उर्फ शाम वसंत ढगे या 24 वर्षीय सराईत आरोपीने किनवट येथे लपवून ठेवलेल्या 20 मोटर सायकली जप्त करण्यात आल्या. या टोळीने वेगवेगळ्या ठिकाणाहून या मोटर सायकली चोरल्या होत्या. 7 लाख 5 हजार रुपये किंमतीच्या या मोटर सायकली आहेत. आतापर्यंत या टोळीकडून 20 लाख 65 हजार रुपये किंमतीच्या 55 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस पथकाने आर्णी येथे शामराव उर्फ शाम वसंत ढगे (24) रा. गंगा नगर ता. किनवट, सैय्यद फिरोज सैय्यद नुसरत अली (21) रा. शास्त्री नगर आर्णी, अब्दुल कादर मो.इक्बाल धारीवाला (32) रा. शास्त्री नगर आर्णी या तीन चोरट्यांना 11 तारखेला आर्णीतून अटक केली होती. त्यांच्या जवळून शास्त्री नगर परिसरात त्यांनी लपवून ठेवलेल्या तब्बल 35 चोरीच्या मोटर सायकली जप्त करण्यात आल्या होत्या. त्यांच्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये या तीनही लोकांकडून त्यांची सखोल चौकशी केली असता आणखी 20 मोटर सायकली किनवट येथे असल्याचे त्यांनी कबुल केले.
या मोटर सायकली देखील जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक अमरसिंह जाधव, पोलीस निरिक्षक मुकूंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक संतोष मनवर, ऋषी ठाकुर, संजय दुबे, योगेश गटलेवार, गणेश देवतळे, अमोल चौधरी, किरण श्रीरामे आदी सहकार्यांनी ही कामगीरी यशस्वी पार पाडली.
