चाकूच्या धाकावर लुबाडण्याचा बनाव - लुडो चा खेळ - पोलिसांची भूमिका .


विलास नसले
मूर्तिज़ापुर :- मागील काळात 'ब्ल्यू व्हेल'या खेळाने देश-विदेशात  खळबळ उडवून दिली होती. त्या खेळाच्या माध्यमातून  विद्यार्थी व लोकांचे जीव गेल्यानंतर समाज आणि यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या होत्या. आता तशाच प्रकारच्या गंभीर वळणावर लुडो या खेळाने युवा वर्ग आणि विद्यार्थ्यांना आणून ठेवले आहे. लुडो नावाचा खेळ मनोरंजना कडून आता जुगाराकडे चालला की काय ? आणि त्याला जुगाराचे स्वरूप येत आहे की काय ?असा गहन प्रश्न निर्माण होत आहे.अँड्रॉइड स्वरूपाच्या भ्रमणध्वनीवर हा लुडो नावाचा खेळ तरुणांपासून विद्यार्थ्यांपर्यंत खेळल्या जात असून याच्या आहारी जात असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.सदर खेळ पैज लावून खेळला जात आहे. विद्यार्थी वर्ग पैसे मिळविण्यासाठी वाममार्गाचा किंवा आपल्या पालकांशी खोटे बोलण्याचा प्रयत्न करून पैसे मिळविण्याकरिता धोका पत्करत आहे. अशीच एक घटना शहरात उघडकीस आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून शहर पोलिसांची सतर्कता व सामंजस्य भूमिका यातून एका विद्यार्थ्यांचे भविष्य आणि भवितव्य अंधकारमय होण्यापासून वाचले असे म्हणावे लागेल.                                           या घटनेची पार्श्वभूमीनुुुसार शहर पोलीस स्टेशनमध्ये सोमवार दिनांक 18 /8/2018 रोजी सायंकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान एक शाळकरी विद्यार्थी आपल्या पाठीवर शाळेची बॅग घेऊन पोहोचला. आणि तेथे येऊन त्याने मला दोन-तीन इसमांनी चाकूचा धाक दाखवून माझ्या बँग मधील पाच हजार रुपये आणि गळ्यातील सोन्याचे बदाम हिसकावून नेल्याची गोष्ट पोलिसांना सांगितली. त्याच्या तोंडून हे ऐकताच पोलीस स्टेशनमधील पोलीसही हादरले .त्यांनी तात्काळ ही बाब ठाणेदार आव्हाळे यांना सांगितली. त्यानंतर यंत्रणा कामाला लागली .कारण सदर प्रकार हा वर्दळीच्या ठिकाणी झालेला गंभीर  प्रकार होता. याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सदर विद्यार्थ्याला देखील त्या ठिकाणी  सोबत नेण्यात आले. त्यानंतर सुरू झाला तपासाचा भाग .परंतु त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही लोकांनी आणि सदर विद्यार्थ्याच्या गावातील इतर विद्यार्थ्यांनी असा प्रकार दिसून आला नसल्याचे पोलिसांना सांगितले. तरी देखील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्याचा प्रयत्न सुरू केला. सदर विद्यार्थी याने त्याच्या सोबत घडलेली घटना विद्युत पुरवठा खंडित झाल्याच्या दरम्यान घडल्या बाबत पोलिसांना सांगितले. सदर विद्यार्थ्याच्या गावात जाणारी शेवटची बस आठ ते साडे आठ वाजताच्या दरम्यान असते म्हणून तो बसस्थानकावर आला होता. पोलिसांनी त्याला याबाबत पुन्हा पुन्हा विचारणा केली असता त्यांनी सदर पैसे चाकूच्या धाकावर लुबाडण्यात आल्याचे सांगितले. परंतु पोलिसांनी पुन्हा घटनाक्रमबाबत विचारणा करून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा   समोर आलेला प्रकारअत्यंत धक्कादायक असाच होता. सदर विद्यार्थी हा शाळा सोडून लुडो हा खेळ मोठ्या प्रमाणावर खेळत असल्याचे आणि ते देखील पैज लावून खेळत असल्याचे सांगण्यात आले. या खेळात काही लोकांचे पैसे अंगावर झाल्यामुळे ते पैसे चुकते करण्यासाठी विद्यार्थ्यांनी हा बनाव केल्याबाबत पोलिसांना कळून आले. त्यामुळे या खेळाच्या आहारी जाऊन एक शाळकरी विद्यार्थी अशाप्रकारे कपोकल्पित घटना तयार करून पोलीस स्टेशन पर्यंत जाण्याची मजल मारतो यावरून येणाऱ्या काळात मनोरंजना करीता समजल्या जाणाऱा हा खेळ किती गंभीर आणि भयानक वळण घेऊ शकतो याची कल्पना येते. पालकांनी आपल्या पाल्याकडे गंभीरतेने लक्ष घालण्याची गरज वाटतेे.    पूर्वी   चंफुुुल यानावाने गावांमध्ये खेळला जाणारा खेळ आता अँड्रॉइड मोबाईल वरील ल्युडो झाला आहे. तो मनोरंजन पुरता मर्यादित न राहता कमाईचा मार्ग बनत चालला आहे . कुतूहलातून खेळता खेळता या खेळाच्या आहारी जाऊन पुढे पैज लावून हा खेळ खेळणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पालकांवर मोठी जबाबदारी आलेली आहे. आपली मुले शाळा ;कॉलेज ,शिकवणी वर्ग ,संगणक क्लासेस नियमित आणि पूर्णवेळ करतात की नाही हे आता पालकांनी वेळोवेळी शहानिशा करून घेणे शहाणपणाचे ठरते. प्रमाण कमी असले तरी भविष्यात ते चिंताजनक होऊ शकते, याची आतापासूनच दखल सर्वांंनी घेतली पाहिजे.                                                         शहर पोलिसांनी योग्य रीतीने हा प्रकार हाताळून त्यातील सत्यता शोधत दोन तासात प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला . समजा सामंजस्य आणि सतर्कता यातून या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करत पोलिसांनी आपण समाजाच्या हितासाठी कार्य करतो हे दाखवून दिले आहे .लुडो हा खेळ खेळताना आपण त्याच्या आहारी तर जात नाही ना , याचा  विचार करणे गरजेचे आहे . शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आव्हाळे, पोलीस उपनिरीक्षक जोशी,पोलीस कॉन्स्टेबल कांबे व इतरांनी योग्य रीतीने  प्रकरण हाताळल्याने सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post