संभाजी भिडे गुरुजींवरून काँग्रेसमध्ये संभ्रम


मुंबई :- राज्यात घातपाती कारवायांचा कट रचणाऱ्या तीन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी अटक केली. त्यात शिवप्रतिष्ठान या संभाजी भिडे यांच्या संघटनेच्या सुधन्वा गोंधळेकर यांचाही समावेश आहे. त्याबाबत बोलताना भिडे यांच्यावर कारवाई न केल्याचाच हा परिणाम असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. तसेच संभाजी भिडे यांच्यावर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.

मात्र काँग्रेस पक्षातच भिडे यांना मानणारे अनेक कार्यकर्ते असल्याने पक्षातील अनेक दिग्गज नेते भिडे यांचे सहानुभूतीदार आहेत, असे पक्षातील ज्येष्ठ नेते खासगीत मान्य करतात.

संभाजी भिडे यांच्यावर भिमा-कोरेगाव येथील दंगलीचा आरोप केल्यानंतर अनेक दलित संघटनांच्या बरोबरीनेच काँग्रेसनेही त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. मात्र भिडे यांचे कार्यक्षेत्र असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते तसेच मोठे नेतेही भिडे यांच्याबाबत सहानुभूती ठेवतात.

 त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मागणीकडे सरकारसह इतरही कुणी फारसे गांभीर्याने पाहिले नव्हते. मात्र शुक्रवारी 'एटीएस'ने वैभव राऊतसह ज्या दोघांना अटक केली त्यातील सुधन्वा गोंधळेकर हा 'शिवप्रतिष्ठान'चा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारवर टीका करताना ही विषवल्ली महाराष्ट्रात वाढू दिली गेली व वेळीच उपटली गेली नाही, असे खापर फोडले आहे.

मात्र काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या म्हणण्यानुसार, पक्षाचे अनेक नेते व लोकप्रतिनिधी देखील भिडे यांचे सहानुभूतीदार आहेत. अगदी अलिकडेच सोलापूर येथील काँग्रेसचे सोशल मीडियाप्रमुख तिरुपती परकीपंडला यांनी फेसबुकवरून भिडे यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांना वरिष्ठांकडून विचारणा झाल्याने त्यांनी फेसबुकवरूनच भिडे यांची जाहीर माफी मागितली होती. तसेच प्रसारमाध्यमांनी भिडे यांच्याबाबत विपर्यस्त बातम्या दिल्याबद्दल सर्व दोष प्रसारमाध्यमांवरही टाकला होता, अशी माहिती काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने दिली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post