मुंबई :- दरवर्षी १५ ऑगस्टला गणपती मिरवणुकांना थाटामाटात, जल्लोषात सुरुवात होते. यंदा मात्र या मिरवणुका थोड्या उशिराने निघणार आहेत. अनेक गणपती मंडपांना अजूनही परवानगी मिळाली नसल्याने तसेच गणपती कारखान्यांनाही उशिरा परवानगी मिळाल्याने बाप्पांचे मंडपातील आगमन लांबले आहे.
स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी असल्याने रस्त्यावर वाहनांची फारशी गर्दी नसते. त्यामुळे मोठ्या मंडळांना बाप्पांची मिरवणूक काढणे सोपे जाते. या वर्षी मात्र १५ ऑगस्टला अनेक मोठे गणपती कारखान्यातून बाहेर पडणार नाहीत. काही लहान गणपती मंडपांकडे प्रस्थान करतील. मात्र बाप्पांसाठी अजून मंडप उभारणी झाली नसल्याने बाप्पांची मूर्ती विराजमान करायची कशी, असा प्रश्न गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. शनिवारी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या विनंतीवरून महापालिका अधिकारी, मेट्रो अधिकारी तसेच वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मेट्रोबाधित मार्गाची पाहणी केली. यावेळी २६ ऑगस्ट आणि त्यानंतरच्या सुट्टीच्या दिवशी गणेश आगमन मिरवणुका निघतील, अशी माहिती समन्वय समितीतर्फे देण्यात आली. यासाठी २२ ते २४ फूट रस्त्यांची गरज भासणार आहे. मेट्रोमुळे एवढ्या रुंदीचे रस्ते उपलब्ध होत आहेत का त्याची पाहणी करून २६ ऑगस्टपासून त्याची तजवीज करण्याचा निर्णय झाला आहे. समन्वय समिती अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनीही आगमन मिरवणुकांना उशीर होणार असल्याचे सांगत, सरकारी परवानगीचाच मुद्दा मांडला.
- उपनगरांतील मेट्रोबाधित रस्त्यांची उद्या पाहणी