फिक्स डोस कॉम्बिनेशनच्या औषधांवर केंद्र सरकारने बंदी आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास फेंसेडिल, सॅरिडॉन, डी-कोल्ड, टोटलसारख्या सुमारे ३४३ औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी येईल. हा निर्णय ठाणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगला असला तरी सध्या ठाण्यातील ५० टक्क्यांहून अधिक लोक हे 'सेल्फ मेडिकेशन' घेत असल्याचे जिल्हा मेडिकल असोसिएशनचे म्हणणे आहे.
दररोजच्या घरगुती कामाबरोबरच ऑफिसचा तणाव आणि त्यात लोकलमधून करावा लागणारा धावपळीचा प्रवास यामुळे सततच्या दुखण्यावर पेनकिलरचा पर्याय निवडला जात आहे. डोकेदुखी, पाठदुखी, दाढदुखी किंवा अंगदुखीवर सर्रास पेनकिलर घेतले जाते. पेनकिलर घेण्याचे प्रमाण कष्टकरी कामगार आणि महिलांमध्ये सर्वाधिक असल्याचेही वास्तव पुढे आले आहे.
सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी यांसारख्या आजारांवर स्वत:च औषध घेण्याचे प्रमाण हे ५० टक्क्यांहून अधिक आहे. कामगारवर्ग आणि महिलांमध्ये पेनकिलर गोळ्या घेण्याची सवय लागली आहे. या गोळ्यांच्या दुष्परिणामांबाबत हे लोक अनभिज्ञ आहेत.
-संजय धनावडे, अध्यक्ष, जिल्हा मेडिकल असोसिएशन
पेनकिलर सातत्याने घेतल्यास आतड्यांवर परिणाम होतो. उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेली व्यक्ती सतत पेनकिलर घेत असल्यास त्या व्यक्तीच्या मूत्रपिंडांवर परिणाम होऊन ती निकामी होण्याची शक्यता अधिक असते.
-डॉ. आर. बी. कुलकर्णी, माजी जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे