- नायपॉल यांच्या आठवणींना मलिका अमरशेख यांनी दिला उजाळा
मुंबई :-भारतातील लेखकांच्या मुलाखती घेण्यासाठी व्ही. एस. नायपॉल मुंबईत आले असताना नामदेव ढसाळ यांना भेटण्यासाठी नायपॉलना घेऊन मी कामाठीपुरा येथे गेले होते. तेथे देहविक्रय करणाऱ्या महिलांनी त्यांना गराडा घातला. महिलांच्या या कृत्यामुळे ते वैतागले आणि तेथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा आमच्या घरी आले तेव्हा 'माझे काल चुकले, एक लेखक असून मी ही बदनाम वस्ती टाळली याची मला खंत वाटते,' अशी कबुली दिली. मानवी जीवनाचा हा एक भाग असल्याचे सांगत त्यांनी झाल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली होती, नायपॉल यांच्याबद्दलची ही आठवण कवयित्री मलिका अमरशेख यांनी सांगितली.
आंतरराष्ट्रीय लेखक असलेले व्ही. एस. नायपॉल हे भारतीय वंशाचे होते. भारतातील लोकांचे अंतरंग तपासण्यासाठी त्यांनी भारतातील कवी आणि लेखकांच्या मुलाखती घेण्याचे ठरविले. नामदेव ढसाळ यांची मुलाखत घेण्यासाठी ते घरी आले. पण नामदेव घरी नसून संध्याकाळी परततील, असे सांगितल्यावर त्यांनी पहिली माझीच मुलाखत घेतल्याचे अमरशेख म्हणाल्या. नायपॉल आयुष्य, माणूस आणि समाजाला तपासणारा लेखक आहे, हे ऐकले होते. त्या दिवशी या गोष्टीचा अनुभव आला. एवढ्या मोठ्या लेखकाने माझी तीन तास मुलाखत घेतली. त्यांचे इंग्रजी समजत होते पण मी बोललेले त्यांना समजत नसल्याने एका पत्रकाराने मदत केली. एक गृहिणी इतकी चांगली मुलाखत देऊ शकते तर नामदेव नक्कीच ग्रेट माणूस असेल असे म्हणून ते घरी वाट न बघता नामदेव यांना भेटण्यासाठी कामाठीपुऱ्याकडे निघाल्याचे मलिका यांनी सांगितले.
कामाठीपुऱ्यात 'असाह्य तिरस्कृत नारी संघटना' या संस्थेचे काम नामदेव ढसाळ करीत होते. नायपॉल कामाठीपुरात पोहचताच परदेशी व्यक्ती पाहून देहविक्रय करणाऱ्या महिला गोळा झाल्या. देहविक्रय करणाऱ्या या महिलांच्या गराड्यात त्यांना राहवले नाही आणि नाराज होऊन ते निघून गेले. मात्र अल्पावधीतच त्यांना आपण चुकल्याचे उमगले. जगात प्रत्येक ठिकाणी बदनाम वस्ती आहे. या वस्तीतील महिलांना आणि त्यांच्यासाठी झटणाऱ्या माणसाला आपण टाळू शकत नाही, हे त्यांना जाणवले. त्यांनी फोन करून 'आय एम सॉरी' असे म्हटल्याचे अमरशेख यांनी सांगितले. आपली चूक उमगल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी पुन्हा आले आणि नामदेव यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत त्यांनी 'पॅसेज ऑफ इंडिया' या त्यांच्या पुस्तकात प्रसिद्ध केली आहे. घराबरोबर घरातील प्रत्येकाच्या मनाचा कप्पा तपासणारा लेखक असे नायपॉल यांच्याबद्दल सांगता येईल. लेखकाने कधीच संकुचित वृत्तीचे नसावे. त्याने समाजाच्या प्रत्येक स्तरांतील माणसांना आपल्या लेखणीत सामावून घेतले पाहिजे हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिल्याचे त्या म्हणाल्या.