- विदयार्थ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला भोजनाचा आस्वाद
अकोला :- येथील जवाहर नवोदय विदयालयातील विदयार्थ्यांची जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज भेट घेवून त्यांच्यासमवेत मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी विदयार्थ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला. प्रत्येकाजवळ जावून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. या आस्थेवाईक चौकशीने विदयार्थी भारावून गेले.
जिल्हाधिकारी यांनी आज सकाळी बाभुळगाव येथील जवाहर नवोदय विदयालयाला भेट दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी विदयार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. जीवनात यश मिळावयाचे असेल तर शिक्षणाबरोबरच मुल्यांचे संस्कारही आवश्यक आहे, असे सांगताना ते म्हणाले की, जीवनात अपयश हे येतच असते, मात्र खचून न जाता त्याच्यावर मात करुन यशस्वी होणे गरजेचे आहे. कठोर परिश्रम, संघर्ष, प्रामाणिकपणा, सचोटी या मुल्यांच्या आधारे यश मिळवता येते. शिक्षकांनी ही मूल्य विदयार्थ्यांमध्ये रुजवावीत.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी आपल्या मनोगतात आपण जीवनात कशा प्रकारे यशस्वी झालो, याबददल माहिती दिली. स्पर्धा परिक्षांना सामोरे जाताना काय करावे, याबाबत त्यांनी प्रेरणादायी वक्तव्य केले. स्पर्धा परिक्षा देत असताना कठोर परिश्रमाबरोबरच व्यक्तीमत्वात बदल करणे आवश्यक आहे. तसेच मुलाखतीचे भिती बाळगू नये, असे त्यांनी सांगितले. नीट, आयआयटी, जेईई प्रवेश परिक्षांबाबत येथील विदयार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे याकरीता शिक्षकांना सूचना करण्यात आल्या असून लवकरच तज्ञांमार्फत व ऑनलाईन मार्गदर्शन आपणास मिळेल. असे ते म्हणाले.
यावेळी विदयार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांना स्पर्धा परिक्षा, मुलाखती याबाबत प्रश्न विचारुन शंकांचे निरसन केले. प्रास्तविक विदयालयाच्या प्राचार्य सुमन बेलमारे यांनी केले. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, शिक्षक मिलिंद बनसोडे यांनीही मार्गदर्शन केले. यंदा सहाव्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय पातळीवर बॉक्सिंग स्पर्धेत यश मिळवलेल्या विदयार्थ्यांना प्रमाणपत्र देवुन गौरवण्यात आले.
कार्यक्रमास प्रभात किडसचे संचालक गजानन नारे, वैदयकीय अधिकारी डॉ. राजेश पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहाण, ज्युबली स्कूलच्या प्राचार्या वंदना कुलकर्णी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन शिक्षक अनिल भारसाकळे यांनी केले. आभार उपप्राचार्य डि. एस. थूल यांनी मानले.
- जवाहर नवोदय विदयालय प्रबंधन समितीची बैठक संपन्न
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली जवाहर नवोदय विदयालय प्रबंधन समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी प्राचार्या श्रीमती बेलमारे यांनी विविध अडचणी व उपक्रमांची माहिती दिली. विदयालयाला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठाच्या बाभुळगाव येथील परिसरात असणाऱ्या विहिरीवरुन तात्पुरत्या स्वरुपात पाणीपुरवठा विदयालयाला केला जाईल, तर भविष्यात विहिर तयार करुन त्याव्दारे पाणीपुरवठा करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. विदयार्थ्यांसाठी वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्याबाबत त्यांनी वैदयकीय अधिकाऱ्यांना सूचना केली. तसेच मेडिकल व इंजिनिरींग प्रवेश परिक्षांसाठी विदयार्थ्यांना मागदर्शन मिळावे या करिता शाळेतील शिक्षकांनी ऑनलाईन मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्याबाबत सूचित केले. यानंतर जिल्हाधिकारी यांनी विदयालयाचे पाहणी केली. तसेच डिजीटल क्लासमधील सुविधांची पाहणी केली. यानंतर विदयालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण पार पाडले.


