कामगार नोंदणीत भाजपाचे कार्यकर्ते घुसविले शिवसेना जिल्हाप्रमुख राजेन्द्र गायकवाड यांचा आरोप


 यवतमाळ :- अटल विश्वकर्मा सन्मान योजने अंतर्गत  कामगारांची नोंदणी केल्या गेली या कामगार नोंदणीत भाजपाने आपले कार्यकर्ते घुसविले भाजपाच्या या कारनाम्याचा भंडाफोड केल्यामुळेच भाजपा नेत्यांची जळफळाट झाली असून त्यांनी काढलेला मोर्चा हा त्याचेच द्योतक असल्याचा  आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेन्द्र गायकवाड यांनी एका पत्रकाव्दारे केला आहे.
कामगार विभागातर्फे नुकतीच बांधकाम क्षेत्राशी संबंधीत कामगारांची नोंदणी केल्या गेली. ही नोंदणी जिल्हयातील सर्व पंचायत समिती कार्यालयात करण्यात आली.  यवतमाळ पंचायत समिती मध्ये नोंदणी सुरु नसल्याच्या कारणावरुन शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे हे कामगार अधिकारी यांच्या कार्यालयात जाब विचारण्यासाठी गेले होते. या ठिकाणी त्यांचा कामगार अधिकारी यांच्यासोबत वाद निर्माण झाला. यानंतर सर्व सुरळीत सुरु असतांना पालकमंत्री मदन येरावार यांनी कामगार अधिकारी कार्यालयात जाऊन  अधिका-यावर दबाव निर्माण केला तसेच  या प्रकरणात पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्यास भाग पाडले. दरम्यान करण्यात आलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी संतोष ढवळे यांना अटक केली.  या अटकेच्या निषेधार्थ शिवसेनेने मोर्चाचे आयोजन केले होते. शिवसेनेच्या मोर्चात स्वयंस्फुर्तीने कामगारांनी सहभाग नोंदविला. आज भाजपाने शिवसेनेच्या विरोधात कामगार सन्मान मोर्चा काढला. या मोर्चात  आमिष दाखवून कामगारांना बोलविण्यात आल्याचा आरोप राजेन्द्र गायकवाड यांनी लावला आहे. भाजपाने मोर्चाच्या माध्यमातून धनशक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न केला असून कामगारांबाबत त्यांचा हा खोटा पुळका जनतेसमोर आल्याचे पत्रकात म्हटले आहे.

  • महिलांना दिले आमिष

भाजपा पदाधिका-यांनी बचत गटाच्या महिलांची सोमवारी पाटीपुरा भागात बैठक बोलविली.  याठिकाणी मोठया संख्येत महिला उपस्थित होत्या.  त्यांना मंगळवारी योजनेतील पाच हजार मिळेल असे आमिष दाखवून बसस्थानक चौकात बोलविण्यात आले. योजनेतील पैसे सरकार देणार असले तरी हे पैसे आपणच स्वता देणार असल्यासारखा आभास निर्माण करण्यात आला. या बाबत अनेक तक्रारी शिवसेनेचे शहर प्रमुख पिंटू बांगर यांचे कडे करण्यात आल्या. दरम्यान हा कामगारांचा सन्मान नसून अपमान असल्याचा आरोप शिवसेनेचे शहर प्रमुख पिंटू बांगर यांनी केला आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post