- सरपंच शिल्पाताई भोपळे यांनी पत्रकार परिषदमध्ये दिली विकासकामांची माहिती
जितेश कारीया
हिवरखेड :- जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या हिवरखेडच्या विकासाबाबत सातत्याने चर्चा, आरोप प्रत्यारोप सुरू राहत असल्याने अखेर सरपंच सौ शिल्पाताई भोपळे यांनी पत्रकार परिषद बोलावून त्यांच्या कार्यकाळात मार्गी लागलेल्या व प्रस्तावित असलेल्या कोट्यवधींच्या विकास कामांची माहिती दिली. सर्व प्रथम पत्रकार बांधवांनी सरपंच व मंचावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सरपंच शिल्पाताई भोपळे, उपसरपंच शकील अली मिरसाहेब, मिलिंद भोपळे, रमेश दुतोंडे, बजरंग तिडके, दशरथ गावंडे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
22 महिन्यांच्या अल्पकाळात १४ वा वित्त आयोग, आमदार निधी यांच्यासह विविध योजनांमधून आजमावतो जवळ्पास दिड कोटींची विकासकामे पूर्ण झाली असून आणखी लक्षावधी रुपयांची कामे प्रस्तावित असल्याचे सांगून सरपंचांनी विकासकामांची यादी पत्रकारांना दिली.
पत्रकार परिषदेत हिवरखेड च्या विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली. यावेळी आपल्या मनाप्रमाणे बातमी न लागल्यास किंवा बातमीमध्ये विरोधात काही छापून आल्यास विविध माध्यमातून पत्रकारांना धमकवण्याचे, त्यांच्यावर दबावतंत्राचा वापर करण्याचे प्रकार हिवरखेड येथे वाढले असून सरपंच म्हणून ह्या बाबींवर आपण निर्बंध आणण्याकरिता प्रयत्न करावे. कारण पत्रकारांवर दबाव आणणे ही बाब लोकशाहीला घातक असल्याची बाब पत्रकारांनी सरपंचाच्या निर्दशनात आणून दिली.
पत्रकार परिषदे दरम्यान लेंडी नाल्या स्वच्छता, नाली बांधकामे, गावातील मुख्य प्रवेश रस्ता , ग्रामसभा, दत्तभारती रस्ता, यासह अनेक समस्यांवर पत्रकार बांधवांनी प्रश्नांची सरबत्ती केली. यावर सकारात्मक पाऊले उचलण्याचे आश्वासन सरपंचांनी दिले. तसेच पत्रकार संघाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हिवरखेड ग्रामपंचायत तर्फे सरपंच व मान्यवरांनी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष धिरज बजाज आणि प्रेस क्लब हिवरखेड चे अध्यक्ष मनीष भुडके यांचा शाल श्रीफळ देऊन यावेळी सत्कार केला. सदर पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते...