मूर्तिजापूर :- १६ अॉगष्ट पासून गायब असलेल्या वाडेगाव येथील माजी सरपंच आसीफखान मुस्तफाखान यांच्या खूनप्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन मध्ये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाती माय लेकासह सहा आरोपींना येथील न्यायालायाने २७ अॉगष्ट पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली होती. दरम्यान पोलीस कोठडीची मूदत सोमवारी संपली आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत शुक्रवार ३१ अॉगष्ट पर्यंत वाढ केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. सो हेलखान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तसेच बाळापूर पोलीस ठाण्याचे ए एस आय गौर यांनी दिलेल्या माहितीवरून काजळेश्वर येथील ज्योती अनिल गणेशपुरे, वैभव अनिल गणेशपुरे व इतरांनी संगनमत करुन जिवे मारण्याच्या उद्देशाने वाडेगांव येथील सरपंच आसिफखाँ मुस्तफाखाँ यांचे अपहरण केल्याच्या आरोपावरुन ज्योती अनिल गणेशपुरे, वैभव अनिल गणेशपुरे, स्वप्निल वानखडे व इतरांविरूद्ध भादंविच्या ३६३ व ३६४ कलमांतर्गत येथील शहर पोलीस ठाण्यात रविवार १९ अॉगष्ट रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता.
त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना सोमवारी २७ अॉगष्ट पर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर गुरुवारी २३ अॉगष्ट ला रामदास पखाले, अशोक साबनकर आणि मो. वारीस शेख हुसैन(सर्व राहाणार काजळेश्वर) यांना पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांचीही रवानगी आजपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली होती.
दरम्यान आसिफखान यांचा मृतदेह पूर्णा नदीपात्रात सापडल्यानंतर याप्रकरणी खूनाचा गुन्हा भादंविच्या ३०२ कलमानुसार नोंदविण्यात आला होता. सर्व सहा आरोपींचा पीसीआर आज संपणार आसल्यामुळे येथील शहर पोलीसांनी त्यांना न्यायालयात सादर केल्यानंर त्यांचा पोलीस कोठडीत शुक्रवार ३१ अॉगष्ट पर्यंत वाढ करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार एपीआय दत्तात्रय अव्हाळे करीत असून ग्रामीण ठाणेदार एपीआय नितिन पाटील त्यांना सहकार्य करीत आहेत.
