पुरग्रस्तांना तातडीने मदत द्या- खा. भावनाताई गवळी यांची सुचना



  • नदीच्या पुराने दिग्रसमध्ये हाहाकार, पुरग्रस्त भागाची केली पाहणी

 यवतमाळ :- दिग्रस तालुक्यातून वाहणा-या धावंडा तसेच अरुणावती नदीला आलेल्या पुरामुळे नागरीकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान आज खासदार भावनाताई गवळी यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी करुन पुरग्रस्तांना तातडीने मदत देण्याच्या सुचना अधिका-यांना दिल्या. 


१५ ऑगस्ट पासून सतत दोन दिवस  झालेल्या मुसळधार पावसामुळे धावंडा तसेच अरूणावती नदीला पुर आला. या पुरामुळे दिग्रस तालुक्यात प्रचंड नुकसान झाले. धावंडा नदीचे पाणी  दिग्रस शहरात शिरल्याने  नागरीकांची तारांबळ उडाली.  पाणी अनेकांच्या घरात शिरल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले.  नांदगव्हान, धानोरा खुर्द, विठाळा, हरसूल, वरंदळी, कांदळी सह अनेक  गावांमध्ये पुरामुळे मोठे नुकसान झाले. ही माहिती मिळताच खासदार भावनाताई गवळी आज दिग्रस मध्ये पोहोचल्या. त्यांनी शास्त्री नगर, मानोरा चौक, विठ्ठल नगर, वाल्मीक नगर, घंटीबाबा मंदीर परीसर, व्यापारी लाईन, मोती नगर सह इत्यादी भागात पाहणी केली. नागरीकांना धिर देत शासन तुमच्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली. यावेळी त्यांच्यासोबत शासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसिलदार किशोर बागडे तसेच शिवसेनेचे  अरविंद मिश्रा, सुरेश झोड, दिपक फिसके, बाळु जाधव, पुनम पटेल, राजेश चिरडे, दिनेश महिन्द्रे उपस्थित होते.


  • शेतीचेही सर्वेक्षण करा

मुसळधार पाऊस तसेच पुरामुळे दिग्रस तालुक्यात शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतक-यांची जनावरे सुध्दा वाहून गेली. दरम्यान शेतीचे सुध्दा सर्वेक्षण करुन शेतक-यांना मदत मिळवून  देण्याच्या सुचना खासदार भावनाताई गवळी यांनी दिल्या आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post