नवी मुंबई :- नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे मराठा संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे एका तरुणाचा बळी गेला आहे. दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्या रोहन तोडकर (वय २१) या तरुणाचा उपचारादरम्यान जेजे रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी मराठा संघटनांनी पुकारलेल्या बंदला नवी मुंबईत हिंसक वळण लागले होते. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याने आंदोलकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत रोहन तोडकर गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
नवी मुंबईतील वाशी, कळंबोली, कोपरखैरणे येथे हिंसा घडवल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५६ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये परप्रांतीय असल्याचेही उघड झाले आहे. नवी मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात असून खबरदारीचा उपाय म्हणून काही कंपन्यांनी खारघर परिसरातील इंटरनेट सेवा बंद केली आहे.
