![]() |
| सरासरीपेक्षा जास्त पाऊस पीक परीस्थिती सर्व साधारण |
संजय उमक
मूर्तिजापूर :- तालुक्यात सोयाबीन कापूस तुर या मुख्य पीकांचा पेरा झाला आहे. सदरच्या पीक पेऱ्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत बऱ्याच प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे. प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्याने काही भागातील पीकांची नासाडी झाली आहे तर काही भागातील शेती खरडून गेल्याने शेतकरी आसमानी संकटात सापडला असल्याने पीक परीस्थिती असमाधान कारकच आहे, तद्वतच आंतरमशागतीची कामे जोरात सुरू आहे.
गत आठवड्यात कुरुम, माना परीसरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने परीसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे
जून महिन्या पूर्वी पेरणीसाठी शेतकऱ्यांनी आपली शेती तयार केली पंरतु ७ जून पासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक हेक्टवरील पेरण्या रखडलेल्या होत्या त्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीचा जुगार खेळलाच तर सतत पडत असलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना पेरणीच करता आली नसल्याने गतवर्षीच्या तुलनेत बऱ्याच प्रमाणात पेऱ्यांमध्ये घट आली आहे. तर बोंड अळीच्या भितीने कापूस पेरा खुपच कमी झाला आहे आहे.
गतवर्षी ६२ हजार १२८ क्षेत्रावर खरीप पेरणी करण्यात आली होती त्या मध्ये ज्वारी चा पेरा केवळ दोन हेक्टर होता मात्र यावर्षी ज्वारी पेरा निरंक आहे. यावर्षी सोयाबीन 53 हजार ८८० हेक्टर, कापूस ७ हजार २५० हेक्टर, तुर ८ हजार ४५ हेक्टर, मुग ३ हजार ६९६ हेक्टर, उडीद १ हजार ६२८ हेक्टर ज्वारी निरंक एकुण 53 हजार ६१७ हेक्टर शेतजमीनीवर खरीप हंगामात करण्यात आला. यावर्षी जुलै अखेर सरासरी ५८४.१ मिलीमीटर येवढी पावसाची नोंद झाली आहे गतवर्षीचा पावसाळ्याचा पुर्ण पाऊस या दिड महिन्याच्या कालावधीतच झाल्याने जलसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. तालुक्यातील काहीच भागातील पीकांची स्थिती चांगली आहे. असली तरी कपाशी पीकांवर तुडतुडे व सोयाबीन पीकांवर उंट अळीचा प्रादुर्भाव तुरळक प्रमाणात दिसून आला आहे.
सध्या कपाशी आणि सोयाबीन पीकांवर उंट अळी आणि तुडतुडे या किटकांचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेउन प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावे आणि निंबोळी कर्काची फवारणी करुन वेळीच किटकांचे निर्मूलन करावे.
अमृता काळे
तालुका कृषी अधिकारी, मूर्तिजापूर

