अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने पतीचा खून


यवतमाळ : अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने प्रियकर व मित्राच्या मदतीने पत्नीने पतीचा खून केला. दगडाने ठेवून खून केल्यानंतर अपघाताचा बनाव करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार महिन्यानंतर या प्रकरणाचा उलगडा केला असून, पत्नीसह दोघांना जेरबंद करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी मंथन हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  फिरोजाबानो शेख रशिद कुरेशी (४०) रा. कळंब चौक, मो. एजाज मो. मोझम कुरेशी (२९) रा. कळंब चौक, इमरान्नोद्दीन सादीकोद्दीन सैयद (४२) रा. तायडेनगर अशी आरोपींची नावे आहे. १८ मार्च रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास कळंब चौक ते नागपूर रोडवरील शम्मी भंगारवाला यांच्या गोडाऊनसमोर रोडच्या कडेला शेख रशिद फकीर मोहम्मद कुरेशी यांचा मृतदेह आढळला होता. मृतकाच्या शरीरावर प्राथमिक दृष्ट्या अपघाताच्या जखमा दिसत असल्याने मृतकाची पत्नी फिरोजाबानो शेख हिच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गुल्हाणे करीत होत्या.  मृतक रशीदचा अपघात नसून खून असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज बोंडे यांना मिळाली होती. पोलिसांनी खबऱ्याद्वारे माहिती गोळा करणे सुरू केले. ताजनगर येथे रशिदला मारहाण केल्याची माहिती समोर आली होती. आठ दिवसांपासून या संदर्भातील साक्षीदार व पुरावे गोळा केले. अशातच मृतकाचा पुतण्याने घातपाताचा संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी संशयित म्हणून मो. एजाज मो. कुरेशी याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. १७ मार्च रोजी मृतकाची पत्नी फिरोजाबानो हिच्या सांगण्यावरून आरोपी मो. एजाज याने दगडाने ठेवून रशिदचा खून केला.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post