शिवसेनेशिवायही आम्ही निवडणुका जिंकू शकतो : देवेंद्र फडणवीस.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघरमध्ये मिळालेला विजय हेच दाखवून देतो की, शिवसेनासोबत नसली तरी आपण जिंकू शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुंबईत आयोजित भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. आपल्या या विधानाने मुख्यमंत्र्यांनी कुरघोड्यांमध्ये मग्न असलेल्या शिवसेनेला एक प्रकारे प्रत्युत्तरच दिले आहे.

मागील निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेले यश तसेच आगामी निवडणुकांची रणनिती ठरवण्याच्या दृष्टीने झालेल्या या महत्वपूर्ण बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहित करताना ते म्हणाले, पालघरची निवडणूक शिवसेनेशिवाय जर स्वतंत्रपणे लढवण्यात आली तर ती पक्षाला कठीण जाईल, असे मानले जात होते. मात्र, पालघरचा निकाल पाहता आता तसे होणार नाही. त्यामुळे शिवसेना सोबत असो किंवा नसो आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सुचना त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

दरम्यान, बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले, युती एका बाजूने होत नाही, ती दोन्ही बाजूने व्हायला हवी. पालघरच्या निवडणुकीने आमची ताकद पुन्हा एकदा दिसून आली आहे. तरीही शिवसेनेसोबत जाण्याची आमची इच्छा आहे. मात्र, सेनेकडून प्रतिसाद मिळाला तर ठीक नाही तर आम्ही निवडणुकांच्या तयारीला लागलोय, अशा शब्दांत दानवे यांनी अप्रत्यक्षरित्या युती तुटल्याचेच जाहीर केल्याचे बोलले जात आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post