इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
शेतकऱ्यांचा संपूर्ण हरभरा खरेदी केल्याशिवाय हमीभाव केंद्र बंद करू नये,अशी मागणी लोहारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अच्युत साठे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार शोभा पुजारी यांच्याकडे दि.29 मे रोजी केली आहे.
या निवेदनात म्हटले की,काही वर्षाच्या दुष्काळानंतर मागील हंगामात पर्जन्यमान चांगले राहिल्यामुळे हरभऱ्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे.परंतु बाजार भावात हरभऱ्याचे दर कमालीचे कोसळले आहेत.त्यामुळे चार पैशे पदरी पडतील या आशेने शेतकरी शासकीय धान्य खरेदी केंद्राकडे हरभरा विक्रीसाठी घेऊन येत आहेत.मात्र खरेदी केंद्रावरील जाचक नियम व अटीमुळे शेतकरी पुरता हैराण झालेला आहे.त्यातच खरेदी केंद्र बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शहरातील हमी भाव खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या धान्यमाल खरेदीला प्राधान्य देणे अपेक्षीत असताना मात्र परजिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धान्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.त्यामुळे तालुक्यातील 70 टक्के शेतकऱ्यांचा हरभरा खरेदीच्या प्रतीक्षेत आहे. हमीभाव खरेदी केंद्रावर विक्रीसाठी हरभरा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आणला आहे.जवळपास दीड किलोमिटर वाहानांची रांग लागली आहे.आठ ते दहा दिवसापासून रांगेत वाहने उभी आहेत.बारदाणा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत वजन काटा बंद असल्याने वाहन भाड्याचे आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.शिवाय वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्याने धान्यांची नासाडी होण्याचा संभव आहे. तरी तालुक्यातील शिल्लक हरभऱ्याची तत्वरीत खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.यावेळी बाजार समितीचे सभापती अच्युत साठे,उपसभापती प्रा.अनंदराव सूर्यवंशी, विजय लोमटे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
