- महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न
- खरीप हंगामात 4 लाख 82 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन
- जिल्हयात ‘नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प’ राबविण्यात येणार
- गरीब रुग्णांसाठी ‘आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियान’
- जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचे आवाहन
अकोला :- अकोला जिल्हयाचा सर्वांगिन विकास डोळयापुढे ठेवुन आरोग्य, शिक्षण, संरक्षण, मूलभुत सोयीसुविधा याकडे विशेष लक्ष देण्यात येत असून त्यासाठी संबंधित महत्वपूर्ण कामे तडीस नेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी महाराष्ट्र दिनाच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहणप्रसंगी केले. लालबहादुर शास्त्री स्टेडियम येथे आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राकेश कलासागर, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, माजी आमदार वसंतराव खोटरे, माजी नगराध्यक्ष हरिष अलिमचंदानी, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर, आदींसह स्वातंत्र्य संग्राम सैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, सर्व विभागाचे वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, शासकीय व निमशासकीय अधीकारी/कर्मचारी उपस्थित होते.
शुभेच्छा संदेशात पालकमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने विविध योजना जाहीर केल्या आहेत, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी हे शासन आहे. येत्या खरीप हंगामात जिल्हयात 4 लाख 82 हजार 600 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून यासाठी बियाणांचा पुरेसा प्रमाणात साठा उपलब्ध आहे. तर रासायनिक खतांचा पुरेसा प्रमाणात साठा जिल्हयाला प्राप्त होणार आहे. जलसाठयाचे स्त्रोत बळकट करण्यासाठी तसेच टंचाईमुक्त महाराष्ट्र-2019 साठी जलयुक्त शिवार अभियान हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंर्गत मागील 2 वर्षात पुर्ण झालेल्या कामांमुळे 47 हजार 547 टी.सी.एम. पाणीसाठा निर्माण झाला आहे. तर निर्माण झालेल्या पाणीसाठयामुळे 54 हजार 555 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहेत. तसेच मागील वर्षांत 39 हजार 900 मृद आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आल्या आहेत.
अपघातग्रस्त शेतक-यांसाठी शासनाने ‘गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ सुरु केलेली आहे. सन 2017-18 मध्ये या योजनेचा कालावधी 8 डिसेंबर 2017 ते 7 डिसेंबर 2018 असा असून या काळात अपघातग्रस्त शेतक-यांनी प्रस्ताव सादर केल्यास 50 टक्के अपंगत्व आल्यास पात्र शेतक-याला रुपये 1 लक्ष तसेच मृत्यु झाल्यास रुपये 2 लक्ष शेतक-याच्या वारसाला देण्यात येतात.
हवामान बदलामुळे उदभवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उददेशाने महाराष्ट्र शासन व जागतिक बँकेच्या अर्थसाहयाने अकोला जिल्हयात ‘नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पातंर्गत जिल्हयातील 498 गावे निवडण्यात आली आहेत. यापैकी 372 गावे खारपाणपटटयातील आहेत. प्रकल्प क्षेत्रातील लहान शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम करणे आणि लहान शेतकऱ्यांची शेती आर्थिकदृष्टया किफायतशीर होण्यासाठी प्रयत्न करणे, हे या योजनेचे प्रमुख उदेश आहेत. याचा शेतकऱ्यांना निश्चितपणे फायदा होणार आहे. दरम्यान, आपली शेती समृध्द व सुपीक करण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन त्यांनी केले.
पालकमंत्री म्हणाले की, जिल्हयात मार्च-2018 अखेरपर्यंत 2 हजार 503 कृषीपंप वीज जोडण्या करण्यात आल्या आहेत. तर धडक सिंचन मोहिमे अंतर्गत विहिर पूर्ण झालेल्या 2 हजार 343 विहिरींच्या लाभार्थ्यांना विज जोडणी देण्यात आली आहे. तसेच जिल्हयात 572 सौर कृषी पपांच्या लाभार्थ्यांना सौरकृषी पंप देण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत सुमारे 1 लाख 15 हजार 769 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर 486 कोटी 8 लक्ष रुपये एवढी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. दरम्यान आता याच योजनेचा लाभ 2001 ते 2009 या कालावधीतील कर्ज थकित असलेल्या, परंतु 2008 व 2009 च्या कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकरी खातेदारांनाही देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच इमूपालन, शेडनेट, पॉलिहाऊस यासाठी 2001 ते 2016 या कालावधित घेतलेल्या मात्र थकित राहिलेल्या कर्जाचाही समावेश या योजनेत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दारिद्रय रेषेखालील कुटुंबियांच्या आरोग्यासाठी ‘आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत लाभार्थी पडताळणी व माहिती संकलनाचे काम सुरु झाले आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रति वर्ष 5 लक्ष रुपयांपर्यंत मान्यताप्राप्त रुग्णालयातून शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले
‘प्रमोद महाजन कौशल्य व उदयोजकता विकास अभियान’ आणि ‘राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान’ अंतर्गत जिल्हयातील 2 हजार 376 लाभार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून 523 उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे. तर तीन उमेदवारांनी स्वत:चा उदयोग सुरु केला आहे. मागील वर्षी कौशल्य विकास कार्यालयातर्फे सात रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे.
दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी सुरु करण्यात आलेल्या जनता दरबारमुळे सामान्य नागरिकांच्या समस्या त्वरीत सुटण्यास मदत झाली आहे. लोकसहभागातून मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला पुढाकार व त्याला लाभलेला उत्स्फुर्त जनसहभाग हा निश्चितच कौतुकास्पद व भूषणावह आहे, असे ते म्हणाले.
हरित पर्यावरणासाठी शासनाने यंदा तब्बल 13 कोटी वृक्षलागवडीचे उदिष्ट ठेवले आहे. मागील वर्षी दिलेल्या उदिष्टापेक्षाही जास्त वृक्ष लागवड करण्यात आली. या वर्षीही सर्वांनी या मोहिमेत सहभागी होऊन जुलै महिन्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करुन आपला जिल्हा हरित करावा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हयातील पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता एकुण 68 गावांमध्ये 57 टँकरमधून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मागील वर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा. पाणी जपून वापरावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पालकमंत्री यांनी पोलीस परेडचे निरीक्षण करुन मानवंदना स्विकारली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेतंर्गत शहीद जवानाच्या वीर पत्नीस महामंडळाच्या सर्व प्रकाराच्या बस सेवामधून आजीवन मोफत प्रवास सवलत महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कार्यान्वित होत आहे. या योजनेतंर्गत् जिल्हयातील शहीदांच्या वीर पत्नीस पालकमंत्री यांच्या हस्ते प्रवास सवलतीचे पासेस यावेळी देण्यात आले.
विविध विभागांच्या पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये जिल्हा युवा पुरस्कार 2016-2017 साठी राहूल राऊत, साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रिडा बहुउदेशिय मंडळ, पातुर, भारतीय स्वातंत्रयसंग्रामात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबददल कै. नथ्थुजी विष्णुजी उमाळे यांना मा. मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र त्यांचे वारस अरुण उमाळे यांना देण्यात आले. आदर्श तलाठी पुरस्कार तलाठी आर.के. पुरी, राष्ट्रीय स्तरावर शरीर सौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याबददल मनोज बागडे यांना गौरवण्यात आले.
जिल्हा पोलीस दलातील प्रंशसनीय सेवेबदल सुरेश चौधरी, शिवकुमार दुबे, भीमराव जाधव, विजयबहादुरसिंग गौर, इंद्रजीत देशमुख, अजय पोहनीकर, एकनाथ चक्रनारायण संजय चरपे, प्रेमदास राठोड, नितीन ठाकरे, मोहन फरकाडे, सुरेंद्र जोशी, विष्णुप्रसाद तिवारी, राजेंद्रसिंग चव्हाण, विजय सातव, विनोद ठाकरे, पोलीस प्रशिक्षण केंद्रा्रचे अरविंद दुबे, किसन नवघरे, श्रावण मानकर, प्रेमकुमार मिश्रा, हर्षु रत्नपारखी, तसेच तालुका स्मार्ट म्हणून निवडलेल्या ग्रामपंचायती म्हातोडी, ता. अकोला, धाबा, ता.बार्शिटाकळी, बेलुरा बु., ता.पातुर, खापरखेड, ता. तेल्हारा, जितापुर खेडकर, ता.मुर्तिजापूर, धारेल, ता.अकोट, खिरपुरी बु. ता. बाळापूर यांना गौरवण्यात आले. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकातील कर्मचारी सुनिल कल्ले, हरिहर निमकंडे, पी.एस. दामोदर, दिपक सदाफळे, देवेंद्र तेलकर तसेच मातानगर वासाहतीला लागलेली आग विझवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबददल महानगर पालिका अग्नीशमन विभागाचे रमेश ठाकरे व त्यांच्या सहकार्याने गौरविण्यात आले. यानंतर विविध विभागांनी काढलेल्या परेड संचालनाची पाहणी करुन मानवंदना स्विकारली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत बुले व रिना धोटे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
महाराष्ट्र दिनाच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


