बँकांनी शेतकऱ्यांना जलदगतीन पिक कर्ज दयावे --- जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय



अकोला :-  शेतकऱ्यांसाठी पुढील महिना अत्यंत महत्त्वाचा असून खरीप हंगामासाठी  बियाणे, खते खरेदीकरीता बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने पिककर्ज दयावे.  शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण भासू देऊ नये, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सुलभपणे पिक कर्ज मिळण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावा. या कामात कुठल्याही प्रकारे दिरंगाई करु नये, अशी सूचना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज बँक अधिकाऱ्यांना केली आहे.
 खरीप पिक कर्ज वितरणाबाबत आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. त्यावेळी सदर सूचना देण्यात आली. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, सहकार उपनिबंधक गोपाळ मावळे, नाबार्डाचे प्रबंधक श्री. वाळके आदींसह बँकांचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
 शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा मोठा हंगाम असतो. या हंगामात शेतकऱ्यांना शेतीत गुंतवणुकीसाठी अर्थसहाय्याची गरज भासते. त्यादृष्टीने शेतकऱ्यांना बँकांकडून तातडीने पिक कर्ज पुरवठा होणे आवश्यक आहे. त्याकरीता  बँकांनी शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी जलदगतीने कार्यवाही करावी, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना तातडीने कर्ज दयावे.  तसेच अन्य शेतकऱ्यांनाही कुठलीही अडचण भासू न देता कर्ज दयावे. बँकेच्या दर्शनी भागात ‘अर्ज दया, कर्ज घ्या, पिककर्जाबाबत शेतकऱ्यांना अडचण आल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांक 1077  वर संपर्क साधावा’ अशा मजकुराचे फलक लावावेत, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली.  

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post