![]() |
अकोला :- अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांचे चिरंजीव शौर्यचा वाढदिवस आज अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. अकोलाचे वैभव असणाऱ्या मोर्णाच्या विकासासाठी रुपये 10 हजाराचा धनादेश आज चिमुकल्या शौर्यने जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडे सुपूर्द केला.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर, त्यांच्या पत्नी तन्वी, मोठा मुलगा रणवीर, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे व अन्य अधिकारी उपस्थित होते. मोर्णा काठी घाट निर्मिती, बगीचा, शोष खडडे या कामांसाठी या निधीचा विनीयोग केला जाणार आहे.
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचे वैभव असणाऱ्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला दि. 13 जानेवारीपासून प्रारंभ झाला. सुमारे 14 टप्प्यात पार पडलेल्या या मोहिमेमुळे मोर्णाचा कायापालट झाला आहे. लोकसहभागातून ही नदी मोठया प्रमाणात स्वच्छ करण्यास यश मिळाले आहे. मोर्णाच्या स्वच्छतेबरोबरच जिल्हा प्रशासनाने मोर्णाचा विकास करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या कामासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी आपले योगदान देण्याचा निश्चय केला. लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक यांनी मोर्णाच्या विकासासाठी सढळ हाताने निधी दिल्याने नदीकाठी विविध विकास कामांना गती आली आहे.
