तर शेतकऱ्यांची मुले भगतसिंगाच्या वाटेने जातील-रघुनाथदादा पाटील



चंद्रपुर (प्रतिनिधि):-सरकार शेतकरी लूटीचे धोरण बदलन्यास तयार नसेल, तर देशातील शेतकरी यापुढे आत्महत्येच्या मार्गानेच जातील असा गैरसमज खासदार-आमदारांनी करून घेऊ नये तर ती यापुढे शहीद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, चंद्रशेखर आझाद या स्वातंत्र्य सैनीकांच्या मार्गाने जातील असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटिल यांनी दिला. दि. २३ मार्च पासून शहीद अभिवादन शेतकरी जनजागरण यात्रा इस्लामपूर येथून सुरु झाली, ही यात्रा आज दि. १३ एप्रिल रोजी चंद्रपुरात दाखल झाली यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


 पूढे बोलताना रघुनाथदादा म्हणाले की, शेती-मालाचे भाव वाढले की एसोचेम, रिझव्र बैंक, अरुंधती भटाचार्य या सारख्या संस्थाचे प्रमुख वाटेल असे बोलण्याचे धाडस करतात, परंतु चहूबाजुनी डिझल, पेट्रोल, सोने, हीरे, मोती, सीमेंट, लोखंड इत्यांदिचे भाव कितीतरी पटीने वाढत असताना त्याबाबत 'ब्र' देखील काढत नाहीत. ह्यांची महागाईची परिभाषा काय आहे हे एकदा त्यांनी स्पष्ट करावे. शेतीमालाच्या रास्तभावासाठी, सरसकट कर्जमुक्ति मिळावी, आयात निर्यात धोरण बदलावे यासाठी आमचा हा लढा सुरुच राहील असेही पाटिल शेवटी म्हणाले. शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट म्हणाले की, परदेशातून सरकार तुरदाळ, कापूस, खाद्यतेल, कांदे चढ़या भावाने आयात करून देशातील शेतीपिकांचे भाव पाडते. नेहरुपासून सुरु असलेले शेतकरी विरोधी धोरण अनेक सरकारे आली गेली पण बदलले नाही. सत्यशोधक शेतकरी सभेचे श्री. किशोर ढमाले म्हणाले की फडणवीस सरकार, मोदी सरकारची विश्वासाहर्ता संपली असून ह्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सरसकट कर्जमाफ़ीचा शब्द देऊन त्यांनी तो ईतक्या वेळा फिरवला की, मटका किंग रतनखत्री जास्त विश्वासाह् वाटतो.


 बळीराजा शेतकरी संघाचे गणेशकाका जगताप यांनी शेतकऱ्यांनी कोणतेही शेतीविषयक कर्ज, विजबिल व मुलांचे शैक्षणिक कर्ज भरू नये असे आवाहन केले. शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दिनकर दाभाड़े यांनी विदर्भातील शेतकरी वेगळया विदर्भाच्या बाजूने नसून शेतीमालाच्या रास्तभावाच्या मागणीकड़े शेतकऱ्यांने लक्ष घालू नये म्हणून काही शेतकरी नेतेच भ्रम निर्माण करीत असल्याचा आरोप केला. शेतीमालाला उत्पादन खर्च पन्नास टक्के नफा देण्याची हमी सरकार देत असल्यास वेगळया विदर्भाच्या मागणीचा पाठींब्याचा विचार करू असे दाभाडे म्हणाले.
या पत्रकार परिषदेला संजय जगताप, आनंद भालेकर, रामेश्वर गाड़े, अनंत शिंदे, निळकंठ शिंदे, सुकाणु समितीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बोबडे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रदीप देशमुख, धर्मराज्यचे चंद्रपुर जिल्हा समन्वयक प्रदीप उमरे, चेतन मडावी, मारोती कुरवटकर, किसान क्रांतिचे अरविंद वांढरे, प्रकाश ताजने, बळीराम धोटे, सुनील मुसळे, सोनीजी, दोरकडे व आपचे इतर प्रतिनिधि उपस्थित होते.!!

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post